भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:43 PM2024-05-07T14:43:20+5:302024-05-07T14:44:07+5:30
Lok Sabha Election 2024 : हिरामंडी प्रदर्शित झाल्यानंतर शेखर सुमन यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते शेखर सुमन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. बराच काळ लाइमलाइटपासून दूर राहिल्यानंतर शेखर सुमन हे अचानक संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमधून प्रकाशझोतात आले आहेत. दरम्यान, हिरामंडी प्रदर्शित झाल्यानंतर शेखर सुमन यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
शेखर सुमन यांच्यासोबत काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात शेखर सुमन आणि राधिका खेडा यांना भाजपाचे प्राथमिक सदस्यत्व देण्यात आले. यावेळी भाजपाचे अनेक दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर शेखर सुमन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी शेखर सुमन म्हणाले, "कालपर्यंत मला माहीत नव्हते की मी आज इथे बसणार आहे. मी सकारात्मक विचार घेऊन आलो आहे. जे रामाने ठरवले आहे, ते करावेच लागेल. माझ्या मनात फक्त देशाचा विचार आहे. मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश ज्या प्रवाहात विकसित होत आहे, त्या प्रवाहात सामील होणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे."
याचबरोबर, हिरामंडीमधील नवाबच्या व्यक्तिरेखेबद्दल विचारले असता शेखर सुमन म्हणाले की, "मी हिरामंडी हिट होण्याची वाट पाहत होतो, जेणेकरून लोकांनी असे म्हणू नये की, मी रिकामी होतो. मी सामान्य माणूस आहे. हिरामंडीचा नवाब नाही. माझी नवाबियत हिरामंडीपुरता मर्यादित आहे."
काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती निवडणूक
यापूर्वी शेखर सुमन काँग्रेसमध्ये होते. त्यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक पटना साहिबमधून भाजपा उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत शेखर सुमन यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.