कन्हैया कुमारच्या सभेनंतर एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी व्यासपीठ 'गंगाजलने' धुतले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:09 AM2020-02-11T11:09:18+5:302020-02-11T11:13:16+5:30
कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.
बिहार : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार सध्या सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात बिहारमध्ये जन गण यात्रा यात्रा करत आहेत. कन्हैया जिथे-जिथे जात आहे त्या ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय. तर कन्हैया कुमार यांच्या ताफ्यावर सलग तीन दिवस दगड आणि चप्पल टाकण्याच्या घटनेनंतर दरभंगा येथे त्यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी असलेला व्यासपीठ गंगेच्या पाण्याने धुण्यात आले आहे.
कन्हैया कुमार यांनी 4 फेब्रुवारी रोजी दरभंगा येथे होते. या वेळी कन्हैया यांनी ललित नारायण मिथिला विद्यापीठात (एलएनएमयू) जाहीर सभेला संबोधित केले. कुमार यांच्या जाहीर सभेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी गंगेच्या पाण्याने ते व्यासपीठ धुतले. एबीव्हीपी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, ज्या व्यासपीठावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि इतर अनेक दिग्गजांनी या मेळाव्याला संबोधित केले, त्या व्यासपीठावर देशद्रोहाचे आरोप असलेले लोकं एकत्र आल्यामुळे तो मंच अशुद्ध झाला होता. त्याची शुध्दीकरण आवश्यक होते.
तर यावर बोलताना एलएनएमयूचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आलोक झा म्हणाले की, देशद्रोहाच्या उपस्थितीमुळे हा पवित्र व्यासपीठ अशुद्ध झाला होता. ज्याला आज जप आणि गंगेच्या पाण्याने धुऊन शुद्ध केले गेले. तर कन्हैय्या कुमार यांची जेथे-जेथे बैठक होईल तेथे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांद्वारे त्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यात येईल, असेही झा म्हणाले.