CoronaVirus: कुंभमेळ्यानंतर चारधामवरही कोरोनाचे सावट?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:46 AM2021-04-22T04:46:23+5:302021-04-22T04:46:36+5:30
मे महिन्यात सुरू होणार यात्रा; आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्टची अट
नितीन अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यात कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधाम यात्रेवर या विषाणूची सावली पडणार का असा प्रश्न आहे. येत्या मे महिन्यात ही यात्रा सुरू होत आहे.
उत्तराखंड राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या चारधाम यात्रेसाठी येणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीची म्हणजेच निगेटिव्ह
रिपोर्टची अट घातली आहे, असे राज्याचे पर्यटन मंत्री सतपाल
महाराज यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
नैनिताल उच्च न्यायालयाने याबाबत आलेल्या याचिकांवर सुनावणी घेताना चार धाम यात्रेला दुसरे कुंभ बनू दिले जाऊ शकत नाही, असे म्हटले. न्यायालयाने सरकारकडे औषधे आणि लसीची माहिती मागितली आहे. सरकारने ही माहिती १२ मेपर्यंत द्यायची आहे.
सूत्रांनुसार गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सरकार यात्रेसाठी ई-पास अनिवार्य करणे, भाविकांची संख्या मर्यादित ठेवणे असे निर्णय घेऊ शकते.
गेल्या वर्षी ४.२० लाख भाविकांना मिळाली होती परवानगी...
सामान्यत: ३८ लाख भाविक या यात्रेत दरवर्षी येतात. गेल्या वर्षी मर्यादित लॉकडाऊनमध्येही भाविकांनी चारधाम यात्रा केली. परंतु, त्यांची संख्या ४.२० लाख मर्यादित ठेवली होती.
यासाठी केदारनाथमध्ये रोज ८००, बद्रीनाथमध्ये १२००, गंगोत्रीत ६०० आणि यमुनोत्रीत ४०० भाविकांना परवानगी दिली गेली होती.