लडाखनंतर अरुणाचल प्रदेशही धोक्यात! चीनची 130 किमीवर एअरबेस उभारणी
By हेमंत बावकर | Published: October 26, 2020 09:32 PM2020-10-26T21:32:27+5:302020-10-26T21:37:00+5:30
India China Standoff Latest News: सॅटेलाईट फोटोनुसार रनवेच्या जवळच लष्करी वापरासाठी जागा दिसत आहे. थंडीच्या दिवसांत काही सैन्य आणि हत्यारे सीमेवर तैनात करण्याच्या तयारीत चीन असल्याचे समजते.
भारतासोबत लडाखमध्ये वाद सुरु असताना आता अरुणाचल प्रदेशवरहीचीनचे संकट घोंघावू लागले आहे. इथे चीन नवीन आघाडी उघडण्याच्य़ा प्रयत्नात असून सीमेपासून 130 किलोमीटरवरील चामडो बंगडा एअरबेसचा विस्तार करू लागला आहे. यामुळे चीन युद्धाची तयारी करू लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
चामडो बंगडा एअरबेसवर नव्या लढाऊ विमानांसाठीयुक्त अशी धावपट्टी बांधकाम आणि त्याच्या मेन्टेनन्ससाठी नवीन सुविधांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या बाबतचे सॅटेलाईट फोटो धक्कादायक आहेत. ओपन सोर्स इंटेलिजेंस @detresfa_ ने मिळविलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये चीनचा काळा चेहरा समोर आला आहे. यामध्ये 4400 मीटरच्या उंचीवर चीन लष्करासाठी नवीन रनवे निर्माण करत आहे. हा रनवे याकू नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. येथे आधीच 5500 मीटरचा रनवे आहे. नवा रनवे 4500 मीटर एवढ्या लांबीचा असणार आहे.
सॅटेलाईट फोटोनुसार रनवेच्या जवळच लष्करी वापरासाठी जागा दिसत आहे. थंडीच्या दिवसांत काही सैन्य आणि हत्यारे सीमेवर तैनात करण्याच्या तयारीत चीन असल्याचे समजते. या बेसवर हे बांधकाम जून 2020 पासून सुरु झाले आहे जे आताही सुरु आहे.
हा विमानतळ एवढ्या उंचीवर आहे की येथून चीनची सर्वच लढाऊ विमाने उड्डाण भरू शकणार नाहीत. येथे थंडीच्या दिवसांत तापमान शुन्यापेक्षाही खाली असते. तर सामान्य दिवसांत येथे वेगवान वारे, ऑक्सिजनची कमतरता जाणवते. तसेच हवेमधील घनता कमी असल्याने विमाने येथून उड्डाण करू शकत नाहीत. थंडीच्या दिवसांत येथे 30 मीटर प्रति सेकंदाच्या वेगावे वारे वाहत असतात.
Sitting approximately 160 km North North East of #ArunachalPradesh, #India the Chamdo Bangda Airport in #China has been seeing development activity on site with fresh runway & apron works visible in recent images pic.twitter.com/klfzW05boL
— d-atis☠️ (@detresfa_) October 26, 2020
दरम्यान, चीनने एलएसीजवळ आठ एअरबेस तयार केले आहेत. या एअरबेसवरील फोटो Detresfa ने प्रसिद्ध केला असून तेथील विमानांची माहितीही देण्यात आली आहे. या भागात भारताचे एअरबेस कमी उंचीवर आहेत. यामुळे चीनच्या कोणत्याही हल्ल्याला भारतीय विमाने चोख प्रत्यूत्तर देतील.