हरयाणात नोकरी सोडून खेळाडूंनी घेतली राजकारणात उडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 02:14 AM2019-09-28T02:14:26+5:302019-09-28T02:14:51+5:30
आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले हरयाणातील खेळाडू आता सरकारी नोकरीचा त्याग करुन राजकारणात नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहेत.
चंदीगड : आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले हरयाणातील खेळाडू आता सरकारी नोकरीचा त्याग करुन राजकारणात नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहेत. बहुतांश खेळाडूंनी त्यासाठी भाजपकडे धाव घेतली आहे. राजकारणातील अन्य लोकांच्या तुलनेत या खेळाडूंच्या आयुष्यातील पुस्तकाची पाने अद्याप कोरे आहेत. अशावेळी भाजप जर त्यांना मैदानात उतरवित असेल तर त्यांच्याबाबत कोणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नाही.
भाजपमध्ये दाखल झालेल्या पदक विजेता योगेश्वर दत्त यांनी पोलीसमधील नोकरी सोडली आहे. डीएसपीच्या पदाचा राजीनामा देऊन ते राजकारणात नशिब आजमविणार आहेत. त्यांना सोनिपतच्या गोहाना विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिकिट मिळू शकते. गोहाना या जागेवर दीर्घ काळापासून काँग्रेसचा कब्जा आहे. त्यामुळे भाजप येथे स्टार उमेदवाराच्या शोधात होते.
हॉकी खेळाडू संदीप सिंह हेही डीएसपीची नोकरी सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजप त्यांना कैथल जिल्ह्यातून पेहोवा मतदारसंघातून मैदानात उतरवू शकते. या मतदारसंघातून भाजपला कधीच यश मिळालेले नाही. येथे बहुतांश वेळा इंडियन नॅशनल लोकदल अथवा काँग्रेसचे उमेदवार जिंकत आलेले आहेत. भाजपच्या ‘इस बार ७५ पार’या घोषणेत संदीप सिंह फिट बसताना दिसत आहेत.
विजेंद्र यांनी लढविली आहे निवडणूक
आॅलम्पिक मेडलिस्ट विजेंद्र सिंह यांनी या सर्व खेळाडूंपूर्वीच राजकारणात येण्याचे ठरविले होते. तेही हरियाणा पोलीसमध्ये डीएसपी होते आणि राजीनामा देऊन राजकारणात आले होते. ते हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील आहेत. पण, काँग्रेसने त्यांना लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून तिकीट दिले होते. मोदी लाटेत विजेंद्र निवडणुकीत पराभूत झाले.
आंतरराष्ट्रीय पहिलवान बबिता फोगाट यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनीही पोलीसमधील उप निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. बबिता यांना दादरी जिल्ह्यातील बाढडा मतदारसंघातून भाजप उमेदवारी देऊ शकतो. यापूर्वी पॅरालंपिक पदक विजेतती दीपा मलिक राजकारणात दाखल झाली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेली दीपा रोहतक निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. पण, ऐनवेळी भाजपने दीपा यांच्याऐवजी माजी संसद सदस्य अरविंद शर्मा यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकूनही आले. भाजप आता त्यांना तिकीट देऊ शकते.