सत्ता गमावल्यानंतर यादव कुळाला उपरती
By admin | Published: March 13, 2017 12:56 AM2017-03-13T00:56:21+5:302017-03-13T00:56:21+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांमध्ये झालेल्या मानापमान नाट्याने उभी फूट पडलेल्या समाजवादी पक्षास
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुलायम सिंग आणि अखिलेश या यादव पिता-पुत्रांमध्ये झालेल्या मानापमान नाट्याने उभी फूट पडलेल्या समाजवादी पक्षास दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर यादव कुळाला आता उपरती झाल्याची चिन्हे असून झाले गेले विसरून जाऊन या दोघांनी पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
अखिलेश आणि मुलायम सिंग या दोघांनी मिळून रविवारी समाजवादी पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक घेतली पक्षाची उभारणी करण्यासाठी पुन्हा लोकांमध्ये जाण्याचे आवाहन केले.
वडिलांच्या उपस्थितीत अखिलेश कार्यकर्त्यांना म्हणाले की, समाजवादी पक्ष हा केवळ एक पक्ष नाही. तो एक विचार आहे. तो विचार घेऊन आपल्याला पुन्हा लोकांकडे जावे लागेल.
येत्या आठवड्यात पक्षाच्या नवविर्वाचित आमदारांची आणि निवडणूक जिंकू शकलेल्या उमेदवारांची बैठक घेऊन पक्षाचे यापुढील धोरण ठरविले जडाईल, असेही अखिलेश म्हणाले.
त्याआधी इटावा येथे बोलताना मुलायम सिंग यांनी निवडणुकीतील पराभवाचे खापर (एकट्या) अखिलेश यांच्या माथी फोडणे योग्य होणार नाही, असे सांगितले.
मुलायम सिंग म्हणाले की, हा पक्षाचा पराभव आहे व यासाठी सर्वच जण जबाबदार आहेत. पक्षाने जनादेश म्हणून याकडे पाहायला हवे. जनतेला आमच्याकडे वळविण्यात आम्हीच कमी पडलो. याची जबाबदारी सर्वांवरच आहे.
शनिवारी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अखिलेश यांनी काहीशा तिरकसपणे पराभवासाठी राज्याच्या जनतेला दूषण दिले होते. परंतु मुलायम यांनी तसे केले नाही. मात्र अखिलेश यांच्याप्रमाणे तेही म्हणाले की, भाजपाने राज्याच्या जनतेला वारेमाप आश्वासने दिली आहेत. पाहू या त्यापैकी किती आश्वासने ते पूर्ण करतात!
निवडणुकीआधीच्या पिता-पुत्राच्या भांडणात अखिलेश यांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकलेले त्यांचे चुलते शिवपाल यादव यांनाही वास्तवाने भानावर आणल्याचे दिसते. स्वत: शिवपाल मैनपुरी जिल्ह्यातील जसवंतनगरमधून निवडून आले असले तरी घरातील भांडणाने पक्षाची कशी वासलात झाली. (प्रतिनिधी)