मोदींच्या आणखी एका व्हिडीओवर डिसलाईक्सचा पाऊस; बेरोजगारीवरून तरूणाईचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 11:32 AM2020-09-04T11:32:13+5:302020-09-04T11:40:14+5:30
मन की बातनंतर मोदींच्या यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममधील भाषणावर तरुणाई नाराज
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधला. मोदींच्या 'मन की बात'च्या व्हिडीओवर डिसलाईक्सचा अक्षरश: पाऊस पडला. या व्हिडीओला यूट्यूबवर मिळालेल्या डिसलाईक्सची संख्या लाईक्सच्या तुलनेत कितीतरी अधिक आहे. यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममधील (यूएसआयएसपीएफ) भाषणावर डिसलाईक्सचा पाऊस पडला आहे. भारतीय जनता पार्टी, पीएमओच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर मोदींच्या व्हिडीओला हजारोंच्या घरात डिसलाईक्स मिळाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी काल यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या लीडरशीप समिटला संबोधित केलं. यावेळी मोदींनी भारत कोरोना संकटाचा कशा पद्धतीनं सामना करत आहे, त्यावर भाष्य केलं. सार्वजनिक आरोग्याचा विचार करून कोरोनाचा सामना करण्यासाठी मास्कचा वापर करावा, तोंड झाकावं, असं आवाहन करणारा भारत पहिला देश होता. जानेवारीत देशात केवळ एक टेस्टिंग लॅब होता. आता तिच संख्या १६०० च्या घरात गेली आहे, असं मोदी म्हणाले.
भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलनं मोदींचं यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमच्या लीडरशीप समिटमधील भाषणाचं थेट प्रक्षेपण केलं. हा व्हिडीओ १४ तासांत ३ लाख २४ हजार ६७१ जणांनी पाहिला आहे. आतापर्यंत व्हिडीओला १० हजार लाईक्स मिळाले आहेत. तर डिसलाईक्सची संख्या तब्बल ९१ हजार इतकी आहे. या व्हिडीओवर १९ हजारांपेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत. यातील बहुतांश कमेंट्स तरुणांच्या असून त्यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल संताप व्यक्त केला. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घेतल्या जाणाऱ्या परीक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरही मोदींच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. गेल्या १४ तासांत हा व्हिडीओ ५० हजार ७९१ जणांनी पाहिला आहे. व्हिडीओला साडे तीन हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर डिसलाईक्सची संख्या जवळपास साडे पाच हजार इतकी आहे. या ठिकाणी कमेंट्स करण्याची सुविधा उपलब्ध नाही. नरेंद्र मोदींच्या अधिकृत यूटूयूब चॅनेलवर मात्र व्हिडीओला डिसलाईक्सच्या तुलनेत अधिक लाईक्स आहेत. ३० हजारांहून अधिक जणांनी व्हिडीओ लाईक केला आहे. तर २२ हजारांहून अधिक जणांनी व्हिडीओ डिसलाईक केला आहे. हा व्हिडीओ १४ तासांत २ लाख ६१ हजार ३९४ जणांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर ११ हजारांहून अधिक कमेंट आहेत. त्यातही बहुतांश कमेंट वाढत्या बेरोजगारीवर आहेत.
याआधी मोदींनी रविवारी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. त्यात मोदींनी बेरोजगारी, अर्थव्यवस्था, परीक्षा यावर फारसं भाष्य न केल्यानं तरुणांनी यूट्यूब व्हिडीओच्या खालील कमेंट सेक्शनमध्ये आपला संताप व्यक्त केला. २९ ऑगस्टला भारतीय जनता पार्टीनं आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ७० लाख लोकांना पाहिला आहे. या व्हिडीओला जवळपास ४ लाख लाईक्स आहेत. तर डिसलाईक्सची संख्या ११ लाखांच्या पुढे आहे.
मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस; लाईक्सच्या तुलनेत डिसलाईक्सची संख्या नऊपट
मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस का पडला?... जाणून घ्या ठळक कारणं