माझ्यानंतर ‘पतंजली’चा कारभार ५०० साधुंकडे - रामदेवबाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:49 AM2017-10-02T02:49:41+5:302017-10-02T02:50:01+5:30
‘पतंजली’ उद्योग समूहातून मी निवृत्त झाल्यानंतर माझे वारस म्हणून ५०० प्रशिक्षित साधू या समूहाचा कारभार माझे उत्तराधिकारी म्हणून पाहतील, असे या उद्योग समूहाचे संस्थापक व योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितले.
नवी दिल्ली: ‘पतंजली’ उद्योग समूहातून मी निवृत्त झाल्यानंतर माझे वारस म्हणून ५०० प्रशिक्षित साधू या समूहाचा कारभार माझे उत्तराधिकारी म्हणून पाहतील, असे या उद्योग समूहाचे संस्थापक व योगगुरू रामदेवबाबा यांनी सांगितले.
‘इंडिया टीव्ही’ या वाहिनीवर रजत शर्मा यांच्या ‘आपकी अदलात’मध्ये शनिवारी रात्री बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, मी कधी लहान सहान विचार करत नाही. मी देशाचा विचार पुढच्या ५०० वर्षांचा करतो. ‘पतंजली’चाही माझा विचार पुढील १०० वर्षांचा असतो. याच विचारातून मी ‘पतंजली’च्या कारभाराची वारसा योजना आखली आहे. मी या उद्योग समूहातून बाहेर पडल्यावर, हे माझे वारस कारभार हाती घेतील.
माझ्यानंतर ‘पतंजली’चा कारभार पाहणारे कोणी व्यापारी किंवा ऐहिक विश्वातील लोक नसतील, ते ५०० साधू असतील. त्यांना मी प्रशिक्षण देऊन तयार करून ठेवत आहे.
‘आपकी अदालत’मध्ये रामदेवबाबांवर ‘मुकदमा’ चालविण्यासाठी अनेक भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे बडे अधिकारी व व्यवस्थापन तज्ज्ञ हजर होते.
काही लोक ‘पतंजली’ ही हिंदू कंपनी आहे, अशी टीका करतात, पण ते चुकीचे आहे, असे सांगून रामदेव बाबा म्हणाले, हमदर्द बंधुंनी स्थापलेल्या ‘हमदर्द’ कंपनीस मी कधी (मुस्लीम म्हणून) विरोध केला आहे? ‘हमदर्द’ आणि ‘हिमालया’ या कंपन्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. ‘हिमालया’ समूहाच्या फारुखभार्इंनी मला ‘योगग्राम’साठी जमीनही दिली. त्यामुळे जे लोक असा अपप्रचार करतात, ते निष्कारण तेढ पसरवित असतात.
गोमूत्रास कुराणाची मान्यता
गोमूत्राचा एक औषध म्हणून वापर करण्यास मुस्लिमांची हरकत असण्याचे काहीच कारण नाही. कारण रुग्णावरील इलाजासाठी गोमूत्राचा उपयोग केला जाऊ शकतो, अशी मुभा कुरआननेही दिलेली आहे, असा दावाही रामदेवबाबांनी केला.