मोदींनंतर आता केजरीवालही दाखल होणार मादाम तुसाँ म्युझियममध्ये
By admin | Published: March 22, 2016 12:41 PM2016-03-22T12:41:56+5:302016-03-22T14:27:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठापोठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही 'मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम'मध्ये वर्णी लागणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठापोठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही जगप्रसिद्ध ' मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम'मध्ये वर्णी लागणार आहे. जगातील प्रसिद्ध आणि ख्यातकीर्त व्यक्तींचे मेणाचे पुतळे साकारणाऱ्या लंडनस्थित मादाम तुसाँ या संग्रहालयाची एक शाखा लवकरच दिल्लीमध्ये सुरू करण्यात येणार असून तेथेच आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री असणा-या केजरीवाल यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या म्युझियममध्ये वर्णी लागणारे केजरीवाल हे देशातील पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत.
पुढील वर्षी म्हणजेच २०१७ साली प्रजासत्ताक दिनाच्या आसपास दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे मादाम तुसाँ म्युझियमची शाखा सुरू होणार आहे. त्यानंतर तेथे केजरीवाल यांचा मेणाचा पुतळा ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त दिल्लीत नव्हे तर लंडमधील वॅक्स म्युझियममध्येही केजरीवाल यांच्या पुतळ्याला स्थान मिळणार आहे.
मादाम तुसाँचे भारतातील पार्टनर असलेल्या विझक्राफ्ट एंटरटेनमेंट इंटरनॅशनलने जानेवारी महिन्यात केजरीवाल यांना पत्र पाठवून याबाबत विचारणा करून हे आमंत्रण स्वीकारण्याची विनंती केली. ' भारतीय राजकारणात केजरीवाल यांच्या योगदाना'चा गौरव करण्यासाठी त्यांचा मेणाचा पुतळा बनवून त्याला म्युझियममध्ये स्थान देण्यात येणार असल्याचे त्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून एप्रिल महिन्यात म्युझियमचे कलाकार राजधानी दिल्लीत येणार आहेत.
मादाम तुसाँ म्युझियममध्ये भारतातील अनेक सेलिब्रेटींचे पुतळे आहेत ज्यामध्ये अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, कतरिना कैफ, करिना कपूर, ह्रतिक रोशन आणि माधुरी दिक्षि तसेच कॉमेडी स्टार कपिल शर्मा त यांचा दिग्गजांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळादेखील मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये लागणार आहेे. काही दिवसांपुर्वी म्युझिअमच्या कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.