गुजरातमध्ये भाजपला 'डबल' झटका, नरेंद्र पटेल यांच्यानंतर निखिल सवानींचीही सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 11:18 AM2017-10-23T11:18:56+5:302017-10-23T11:31:22+5:30
नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली आहे. आज सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून भाजपाला डबल झटका बसला आहे. गेल्या दोन दिवसात राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली आहे. आज सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं. मला फक्त लॉलिपॉप ऑफर केला जात असून, आश्वासन पुर्ण केलं जात नसल्याने राजीनामा देत असल्याचं निखिल सवानी बोलले आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत.
Heard about Rs 1 crore offer by BJP to Narendra Patel, I'm upset. Leaving BJP today: Nikhil Sawani, Patidar leader who had joined BJP pic.twitter.com/7vzrUwIMoc
— ANI (@ANI) October 23, 2017
निखिल सवानी यांच्याआधी नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. यावेळी नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. ''यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते'', असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपाला घरचा अहेर दिला. मात्र निखिल सवान यांनी आपल्याला पैशांची ऑफर देण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं आहे.
Wasn't offered money to join BJP. Now I resigned because they are just offering lollipop, fulfilling nothing: Nikhil Sawani, Patidar leader pic.twitter.com/0BM1x9nSeC
— ANI (@ANI) October 23, 2017
'नरेंद्र पटेल यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचं ऐकलं. त्यामुळे मी प्रचंड निराश झालो आहे. मी आज भाजपा सोडत आहे. मी नरेंद्र पटेल यांचं अभिनंदन करतो. एका गरिब कुटुंबातून आले असतानाही त्यांनी भाजपाची एक कोटींची ऑफर नाकारली', असं निखिल सवानी बोलले आहेत.
यावेळी बोलताना निखिल सवानी यांनी आपण राहुल गांधींना भेटणार असल्याचं सांगितलं. 'काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ घेणार असून, त्यांना भेटल्यानंतर माझी पुढील वाटचाल स्पष्ट करेन', असं निखिल सवानी बोलले आहेत.
'भाजपात प्रवेश करण्यासाठी मला कोणत्याही पैशांची ऑफर नव्हती. फक्त लॉलिपॉप दाखवण्यात येत असून, आश्वासन पुर्ण केली जात नसल्यानेच मी राजीनामा देत आहे', असं निखिल सवानी यांनी सांगितलं आहे. 'मी नरेंद्र पटेल यांच्याशी सहमत आहे. पैशांची ऑफर दिली जात असल्याचं मी अनेकांकडून ऐकलं आहे', असंही निखील सवानी यांनी सांगितलं.