पवार-राऊत भेटीनंतर ममता बॅनर्जींच्या 'त्या' विधानामुळे बेरीज-वजाबाकी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 05:24 PM2018-03-27T17:24:33+5:302018-03-27T17:24:33+5:30
2019च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आल्या आहेत.
नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर आल्या आहेत. दिल्लीत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून, त्या भाजपा आणि काँग्रेसचे नेते सोडल्यास इतर नेत्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत.
ममता बॅनर्जी यांनी संसदेतील आरजेडीच्या खासदार असलेल्या मीसा भारती यांचीही भेट घेतली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेना आणि राजदच्या खासदारांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर एक राजकीय विधान केलं आहे. 2019ची लोकसभा निवडणूक ही रंगतदार होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, ममता नवी दिल्लीत जनता दल(युनायटेड)चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवालांसह शिवसेना आणि तेलुगू देसमच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
विशेष म्हणजे विरोधकांना एकत्र करण्यासाठी दिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेणार नाहीत. परंतु त्या सोनिया गांधींची भेट घेऊ शकतात. ममता या नेत्यांच्या भेटीत तिसरी आघाडीसाठी अस्तित्वात येऊ शकते का, याची चाचपणी करणार आहे. त्यामुळेच 2019ची लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आरजेडीच्या खासदार असलेल्या मीसा भारती यांची भेट घेतल्यानंतर ममता अजून राजकीय खासदारांच्या भेटी घेणार आहेत. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या आग्रहाखातर ममता सोनिया गांधींच्या भेटीला जाणार असल्याचीही चर्चा आहे.
ममता 2019च्या निवडणुकीत विरोधकांना एकत्र करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी तिस-या आघाडीसाठी विरोधकांना एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. ममता बॅनर्जी एक स्पष्ट अजेंडा ठेवूनच दिल्लीत दाखल झाल्या आहेत, असंही तृणमूलच्या एका वरिष्ठ अधिका-यानं सांगितलं आहे. काँग्रेस आघाडीचा यूपीएचा आपण भाग बनणार नसल्याचंही ममतांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेसची डाव्यांसोबत आघाडी असल्यानं तृणमूलनं त्यांच्यासोबत जाणं योग्य नसल्याचं त्या नेत्यानं सांगितलं आहे. भाजपाच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी ममतांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचीही भेट घेतली होती. तसेच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनाही समर्थन दिलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी या 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी सर्व शक्यता पडताळून पाहणार आहेत.