कुलूपनाट्यानंतर आप सरकार नमले
By admin | Published: July 24, 2015 01:04 AM2015-07-24T01:04:31+5:302015-07-24T01:04:31+5:30
दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयाला (डीसीडब्ल्यू) कुलूप ठोकण्यात आल्याचा आणि नवनियुक्त अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचा नामफलक हटविण्यात
नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयाला (डीसीडब्ल्यू) कुलूप ठोकण्यात आल्याचा आणि नवनियुक्त अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचा नामफलक हटविण्यात आल्याचा वाद गुरुवारी सकाळी ब्रेकिंग न्यूज बनल्यानंतरच्या नाट्यानंतर आप सरकारने ३० वर्षीय मालीवाल यांच्या नियुक्तीची फाईल नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या मंजुरीसाठी पाठवत नमते घेतले.
आयोग कमकुवत केला जाण्याचा कट रोखण्यासाठी आम्ही मालीवाल यांच्या नियुक्तीसंबंधी फाईल नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडे सादर केली आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जंग यांची भेट घेतल्यानंतर नमूद केले. मालीवाल यांची नेमप्लेट काढण्यात आली; मात्र हा मुद्दा आहे असे आम्हाला वाटत नाही, असेही ते म्हणाले.
मालीवाल यांची नियुक्ती निष्प्रभ ठरते, कारण त्यासाठी कायदेशीर मंजुरी मिळविण्यात आलेली नसून हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन आहे, असे जंग यांनी मंगळवारी स्पष्ट केल्यानंतर वादाची ठिणगी उडाली होती. दरम्यान, सकाळी कार्यालयाच्या दाराला कुलूप लावलेले आढळल्याचा दावा मालीवाल यांनी केला, मात्र काही तासांतच ते उघडलेले दिसले. मालीवाल यांचा नामफलक हटविण्यात आल्याने टीव्ही वाहिन्यांना ब्रेकिंग न्यूज मिळाली.
माझ्या कार्यालयाला कुलूप का लावण्यात आले आणि नामफलक का हटविण्यात आला, असा सवाल मालीवाल यांनी केला. त्याचवेळी महिलांसाठी कार्यरत राहणार असल्याचा व आयोगाला जगातील सर्वात बळकट संस्था बनवणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला. सकाळी वाद गाजल्यानंतर काही वेळातच मालीवाल यांचे ‘विकास सदन’ येथील कार्यालय उघडे आढळून आले; मात्र नामफलक गायबच होता. मालीवाल यांच्या दाव्याशी विसंगत असे हे दृश्य असल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी सकाळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कुलूप आढळून आल्याचा दावा केला. प्रसिद्धी माध्यमांचा दबाव किंवा अन्य काही कारणांमुळे ते उघडले गेले असावे. सकाळी ते लावलेलेच होते. आयोग बंद असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही फायलींवर स्वाक्षरी करता येणार नाही, असे सांगण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मालीवाल यांच्या कार्यालयातील सर्व फाईल्स नेण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. (वृत्तसंस्था)