प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातून ‘जलीकट्टू’ बाद
By admin | Published: January 24, 2017 12:52 AM2017-01-24T00:52:27+5:302017-01-24T00:52:27+5:30
संपूर्ण तमिळनाडूत जलीकट्टू खेळाला कायमस्वरूपी परवानगी मिळावी, या मागणीसाठी हजारो लोक निदर्शने करीत असतानाच
चेन्नई : संपूर्ण तमिळनाडूत जलीकट्टू खेळाला कायमस्वरूपी परवानगी मिळावी, या मागणीसाठी हजारो लोक निदर्शने करीत असतानाच, सरकारने जलीकट्टू खेळ यावर्षीसाठी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातून वगळणारे विधेयक विधानसभेत सोमवारी आवाजी मतदानाने संमत केले.
जलीकट्टूसाठी गेले सहा दिवस सुरू असलेल्या राज्यव्यापी निदर्शने व आंदोलनात २० पोलीस कर्मचारी जखमी झाले. प्राण्यांच्या छळाला प्रतिबंध कायद्यातील तरतुदीतून जलीकट्टूला वगळण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारने घेतला आहे, असे सांगण्यात आले. मात्र त्यापूर्वी चेन्नईमध्ये जलीकट्टू समर्थकांनी ठिकठिकाणी दगडफेक केली आणि अनेक वाहनेही जाळली. मरिना बीचजवळील एक पोलीस ठाण्यालाही त्यांनी आग लावली. पोलिसांनी या निदर्शकांना हुसकावून लावण्यास सुरुवात करताच, जमाव हिंसक झाला आणि त्यांनी सरकारी तसेच खासगी वाहने पेटविण्यास सुरुवात केली. जमावाने पोलिसांवर तसेच वाहनांवर दगडफेकही केली. मुख्यमत्र्यांसह सर्व सत्ताधारी नेते तसेच कमल हासनसह अनेक कलाकारांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.