पाकिस्तानी नागरिकांनो 48 तासांच्या आत जिल्ह्यातून चालते व्हा, बीकानेर डीएमकडून आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:37 AM2019-02-19T09:37:06+5:302019-02-19T09:37:17+5:30
जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
बीकानेर- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान भागात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका मेजरसह पाच जवानांना वीरमरण आलं. शहिदांमध्ये राजस्थानमधल्या एस. राम यांच्या नावाचाही समावेश आहे. तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्यानंतर राजस्थानातील बीकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी एक लिस्ट जारी केली आहे. तसेच त्यांनी सीआरपीसी 144 कलम लागू केल्याची माहितीही दिली आहे.
पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांच्या आत जिल्हा सोडावा, असंही बीकानेरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच बीकानेर हद्दीतील हॉटेलवाल्यांना पाकिस्तानी नागरिकांना आश्रय देण्यावरही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांसाठी हे आदेश लागू केले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर पिंगलान भागात झालेल्या चकमकीत एस. राम शहीद झाले, त्यांचं पार्थिव काल राजस्थानमध्ये आणलं गेलं. 18 तास सुरू असलेल्या या चकमकीत राष्ट्रीय रायफल्स आणि पॅरा फोर्सेसच्या टीमनं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन टॉप कमांडरचा समावेश होता.
पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद
14 फेब्रुवारीला पुलवाम्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानविरोधात जनक्षोभ उसळला. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं घेतली असून, त्याचा म्होरक्या मसूद अजहर आहे.