अदानी समूहाच्या इशा-यानंतर EPW च्या संपादकांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 10:50 AM2017-07-19T10:50:33+5:302017-07-19T11:02:19+5:30
उद्योग समूहाकडून त्या पत्रकाराविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचे प्रकार कॉर्पोरेट इंडियामध्ये वाढले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - अदानी उद्योग समूहाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आल्यामुळे इकोनोमिक अँड पॉलिटिकल वीकली ईपीडब्ल्यूचे संपादक परंजय गुहा ठाकूर्ता यांना संपादकपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. उद्योग समूहाच्या धोरणांवर टीका करणारे लेख लिहील्यानंतर संबंधित उद्योग समूहाकडून त्या पत्रकाराविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचे प्रकार कॉर्पोरेट इंडियामध्ये वाढले आहेत.
ईपीडब्ल्यू साप्ताहिक चालवणा-या ट्रस्टच्या संचालकांनी ठाकूर्ता यांना अदानी समूहावर लिहीलेले दोन लेख मागे घेण्यास सांगितले होते. मागच्या महिन्यात अदानी समूहाने आपल्या वकिलाकरवी ईपीडब्ल्यूला एक पत्र पाठवले. या पत्रामध्ये अदानी समूहाबद्दल लिहीलेले दोन लेख तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. अदानी समूहाने 1 हजार कोटींची कर चुकवेगिरी केली ? आणि मोदी सरकारकडून अदानी समूहाला 500 कोटींचा लाभ असे जानेवारी महिन्यात दोन लेख छापण्यात आले होते.
आणखी वाचा
हे दोन्ही लेख समूहाची बदनामी करणारे असल्याने ते तात्काळ मागे घ्यावे असे पत्रात म्हटले होते. लेख मागे घेतले नाहीत तर, कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी दिल्लीमध्ये समीक्षा ट्रस्टची बैठक झाली. या बैठकीत संपादकीय विभागाला दोन्ही लेख काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीनंतर परंजय गुहा ठाकूर्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्याला दिल्लीमध्ये कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा आहे असे ठाकूर्ता यांनी सांगितले.
समीक्षा ट्रस्टचे प्रमुख दीपक नय्यर आणि अन्य संचालकांडून या घडामोडींबद्दल कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. 20 जुलैला यासंबंधी ट्रस्टकडून बाजू मांडली जाऊ शकते. 1949 साली इकोनॉमिक विकलीची स्थापना झाली. 1966 साली साप्ताहिकाचे ईपीडब्ल्यू असे नामकरण झाले. बिझनेस जर्नलिस्ट आणि राजकीय समीक्षक राहिलेल्या परंजय गुहा ठाकूर्ता यांनी जानेवारी 2017 मध्ये सी. राममनोहर रेड्डी यांच्याकडून संपादकपदाची सूत्रे स्वीकारील होती. ठाकूर्ता यांना जे दोन लेख काढून टाकण्यास सांगण्यात आले होते ते दोन्ही लेख द वायरच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनाही हे लेख काढून टाकण्यास सांगणार आहोत असे अदानी समूहाच्या वकिलाने स्पष्ट केले.