सैन्यातील निवृत्तीनंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण; जवान बनला अधिकारी, आता लग्नही करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 05:37 PM2024-01-17T17:37:23+5:302024-01-17T17:39:47+5:30
नोकरीतील निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगावं किंवा एखादा उद्योग सुरू करुन सेटल व्हावं, असं सर्वसाधारण मत आहे
सध्या तरुणाईची ओढ स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक राज्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे विद्यार्थी प्राधान्याने लक्ष केंद्रीत करत असून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहेत. राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करत अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नुकताच बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, सैन्य दलातून निवृत्ती घेतलेल्या उमेदवाराने स्पर्धा परीक्षातून अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. आनंद सौरव असं या तरुणांचं नाव आहे.
नोकरीतील निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगावं किंवा एखादा उद्योग सुरू करुन सेटल व्हावं, असं सर्वसाधारण मत आहे. मात्र, ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असते, ते नवं चॅलेंज स्वीकारत असतात. बिहारच्या मुजफ्फरमधील पताही गावच्या आनंद सौरव या सैन्य दलातील निवृत्त जवानाने बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पदाची खुर्ची मिळवली आहे. सौरव हे नेव्हीतून निवृत्त झाले होते. त्यानंतर, बीपीएससी परीक्षा देऊन त्यांनी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
आनंद सौरव यांनी १५ वर्षे नेव्हीमध्ये नोकरी केली, २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी बीपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मेन्स परीक्षा पास केल्यानंतर जानेवारी महिन्यात मुलाखतीमध्येही चांगले गुण मिळवून उत्तीर्णांच्या यादीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. बीपीएससी परीक्षेत १०१ वी रँक मिळवत त्यांनी आपत्कालीन निबंधक अधिकारीपदाची खुर्ची मिळवली. कष्ट केल्यावर तुम्हाला यश मिळतंच, असे सौरव यांनी म्हटले. तसेच, ही माझ्या आयुष्यातील तिसरी नोकरी असून नेव्हीतील निवृत्तीनंतर मी बीपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती, असेही त्यांनी सांगितले.
आनंद यांना काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता, त्या अपघातात त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यातून स्वत:ला सावरत आनंद यांनी बीपीएससी परीक्षा क्लेअर केली. आता, लग्नही करायची तयारी ठेवली असून लग्नात हुंडा घेणार नाही, असे आनंद यांनी स्पष्ट केले. आनंदचे वडिल देवनारायण ठाकूर हे निवृत्त शिक्षक आहेत.