'हमे चैन से जीने दे', साक्षीनंतर आता भाजपा नेत्याच्या नातीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:52 PM2019-07-16T12:52:59+5:302019-07-16T13:14:13+5:30
दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजपा नेत्याच्या नातीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
प्रयागराज - दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजपा नेत्याच्या नातीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून कुटुंबीयांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा मुलीने केला आहे. भाजपाचे नेते आणि प्रयागराजचे माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल यांची नात दीक्षा अग्रवालने व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे.
दीक्षा अग्रवालने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे घरच्या मंडळींपासून जीवाला धोका असल्याचं तिने म्हटलं आहे. दीक्षाने काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांच्यापासून धोका असल्याचं तिने व्हिडीओत म्हटलं आहे. तसेच दीक्षाने आपला पती आणि सासरच्या मंडळींना काही झालं तर त्यासाठी आजोबा आणि इतर लोक जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
दीक्षाच्या कुटुंबीयांनी प्रयागराजमधील पोलीस ठाण्यात तिचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दाखल केली आहे. 'माझं नाव दीक्षा अग्रवाल राजपूत आहे. मी 5 जुलै 2019 रोजी ऋतुराज सिंह राजपूत याच्याशी माझ्या मर्जीने लग्न केले आहे. ऋतुराजसोबत मी खूश आहे. आजोबा माजी उपमहापौर मुरारी लाल अग्रवाल, पवन अग्रवाल आणि इतर नातेवाईकांना माझी विनंती आहे की पोलीस प्रशासन व राजकीय ताकद वापरून त्रास देणं थांबवा. मी माझ्या पतीसोबत आनंदात राहू इच्छिते. माझ्यासोबत जर काही चुकीचं झालं तर त्याला घरचे लोक जबाबदार असतील' असं दीक्षाने व्हिडीओत म्हटलं आहे.
'पापा मुझे शांति से जीने दो', दलित मुलाशी लग्न केलेल्या भाजपा आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने व्हिडीओच्या माध्यमातून वडिलांकडून जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. तसेच कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचं तिने म्हटलं होतं. राजेश मिश्रा हे भाजपाचे आमदार आहेत. साक्षीने काही दिवसांपूर्वी पळून जाऊन अजितेश कुमार या दलित तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांनी तिला मारायला गुंड पाठवल्याच साक्षीने व्हिडीओत म्हटलं होतं. अजितेशच्या नातेवाईकांना देखील त्रास देत असल्याचं सांगितलं.
'पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. आमचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या. भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा' असंही साक्षीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी साक्षीने केली होती.