शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या मार्गावर? ममता बॅनर्जी अन् पुतण्यात कोल्ड वॉर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 15:29 IST2025-01-05T15:29:31+5:302025-01-05T15:29:53+5:30
अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या मार्गावर? ममता बॅनर्जी अन् पुतण्यात कोल्ड वॉर...
तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये होणार की काय, अशी शंका उपस्थित करणारी राजकीय घडामोड घडू लागली आहे. तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यात शीत युद्ध सुरु झाले असून पक्षात दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
अभिषेक बॅनर्जी व तृणमुलचे नेत्यांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून पक्षात काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. ममता आणि अभिषेक यांच्यात निर्माण झालेले मतभेद कधीही न संपण्याच्या टप्प्यात जाऊन पोहोचल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ममता यांच्यानंतर पक्षात अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. कलाकारांवर टाकलेल्या बहिष्कारावर ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कोलकाताच्या आरजी कर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात ज्या कलाकारांनी ममता सरकारविरोधात टीका केली त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तृणमुलने घेतला आहे. यास अभिषेक यांचा विरोध आहे. नववर्षाच्या स्वागताला गायिका लग्नजीता चक्रवर्ती हिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. परंतू, कोलकाताच्या स्थानिक नगरसेवकाने हा कार्यक्रम रद्द करत सरकारविरोधात बोललेल्या कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका स्पष्ट केली होती. यावरून हा वाद सुरु झाला आहे.
गायिकेचा कार्यक्रम रद्द केल्यानंतर टीएमसीचे वरिष्ठ प्रवक्ते कुणाल घोष यांनी ३१ डिसेंबरला एक्सवर पोस्ट टाकली होती. त्यात ज्या कलाकारांनी जाणूनबुजून बदनामी केली, मुख्यमंत्री, सरकार आणि पक्षावर टीका केली, अपमान करून चुकीची माहिती पसरविली त्यांना टीएमसी नेत्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही मंचावर घेऊ नये असे म्हटले होते. त्यांचा बहिष्कार केला जावा, असे त्यांनी आवाहन टीएमसी नेत्यांना केले होते.
त्यापुढे जात जर कोणी नेता याच्याशी सहमत नसेल तर त्याने वरिष्ठ नेतृत्वाचा सल्ला घ्यावा, असेही म्हटले होते. अर्थात हे वक्तव्य वरिष्ठांच्या म्हणजेच ममता बॅनर्जींच्या सहमतीनेच केले गेले होते. यावर अभिषेक बॅनर्जी यांनी कोणी पक्षातर्फे असे म्हटले आहे का, ममता बॅनर्जींनी किंवा मी असे म्हटलेय का असा सवाल केला होता. सर्वांना स्वातंत्र्य आहे. मी कोणाला कोणासोबत, कुठे गावे यासाठी बळजबरी करू इच्छित नाही, असे म्हटले होते. अभिषेक यांच्या या भूमिकेलाही अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. यामुळे आता ममता आणि पुतण्यात पक्षातील वर्चस्वावरून कोल्ड वॉर सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.