शिवसेनेनंतर आता एआयएडीएमके पक्षामध्ये फूट, कार्यालयातच दोन गटात हाणामारी, एकमेकांची डोकी फोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:32 PM2022-07-11T12:32:46+5:302022-07-11T12:33:42+5:30
AIADMK Politics: तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या गटात चढाओढ सुरू आहे.
चेन्नई - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदावरून ओ. पनीरसेल्वम आणि के. पलानीस्वामी यांच्या गटात चढाओढ सुरू आहे. दरम्यान, ओ. पनीरसेल्वम यांना मद्रास हायकोर्टाने धक्का दिला आहे. कोर्टाने पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाची चौकट तयार करण्यासाठी जनरल कौन्सिलच्या बैठकीला मान्यता दिली आहे. यादरम्यान, चेन्नईत पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम गटात हाणामारी झाली. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
हायकोर्टाने ओपीएस यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून बोलावलेल्या बैठकीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. ही बैठक आज सकाळी ९ वाजता सुरू होणार होती. तत्पूर्वी ९ वाजता कोर्टाने हा आदेश दिला आहे. त्यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार बैठक झाली.
#WATCH Chennai, TN: O Paneerselvam supporters break open the door of AIADMK office, ahead of party's general council meeting being led by E Palaniswami pic.twitter.com/A5wNwpHPgk
— ANI (@ANI) July 11, 2022
दरम्यान, चेन्नईमध्ये पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम गटात हाणामारी झाली. त्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले. जनरल कौन्सिलच्या बैठकीपूर्वी पनीरसेल्वम यांच्या पाठिराख्यांनी पक्षाच्या कार्यालयाचा दरवाजा तोडला. समर्थक लाठ्या काठ्या घेऊन ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी केली. सध्या पक्षात सिंगल लीडरशिप लागू करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या पाठिराख्यांमधील लढाई हाणामारीपर्यंत पोहोचली आहे.