सहा घटस्फोट, सातव्यासाठी आली न्यायालयात; कायद्याचा गैरवापर करत नवऱ्यांकडून लाटले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 05:42 AM2024-07-28T05:42:36+5:302024-07-28T05:43:07+5:30
यात काही गैरप्रकार आहे, हे न्यायाधीशांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व सातही घस्फाेटित नवऱ्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
बंगळुरू : लग्न करून विवाहिता घरातील दागिने, पैसे घेऊन पळून गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशाप्रकारे लाेकांची फसवणूक करणाऱ्या टाेळ्यांना अटकही करण्यात आली आहे. मात्र, कर्नाटकमधून एक वेगळेच प्रकरण समाेर आले आहे. एक महिला सातव्यांदा घटस्फाेट घेण्यासाठी न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिली. यात काही गैरप्रकार आहे, हे न्यायाधीशांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व सातही घस्फाेटित नवऱ्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयातील सुनावणीचा व्हिडीओ साेशल मीडियावर पाेस्ट करण्यात आला आहे. त्यात न्यायाधीश महिलेच्या वकिलांना विचारतात की, ‘हे सातव्या पतीसंदर्भातील प्रकरण आहे का? सर्वांविराेधात ‘४९८ अ’ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत का?’ त्यावर वकील उत्तर देतात, ‘हाेय. सर्वांविराेधात ‘४९८अ’ अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय महिलेने पाेटगीदेखील मागितली हाेती.’ वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायाधीश म्हणाले, ‘ही महिला कायद्यासाेबत खेळत आहे.’ हुंडाविराेधी कलमान्वये पती आणि सासरच्यांवर गुन्हे दाखल करायचे आणि भली माेठी रक्कम घेऊन तडजाेडीने घटस्फाेटाचे प्रकरण मिटवायचे. एक घटस्फाेट झाला की नवे सावज शाेधाचे, असा तिचा डाव असायचा. (वृत्तसंस्था)
महिला अशी करायची फसवणूक
घटस्फाेटासाठी आलेली महिला एकेका पतीसाेबत सहा महिने ते एक वर्ष राहायची. छळ केल्याची तक्रार दाखल करून माहेरी परत येत हाेती आणि तडजाेडीने पैसे मिळवायची. अशाप्रकारे तिने सहावेळा घटस्फाेट घेतला. सातव्यांदा घटस्फाेट घेत असताना ही बाब न्यायाधीशांच्या लक्षात आली. महिलेचे लग्न आणि संबंधित कागदपत्रेदेखील न्यायालयात सादर करण्यात आली. या प्रकरणाने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे.