गीतानंतर पाकिस्तानच्या 'रमझान'चीही होणार घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 10:00 AM2016-04-07T10:00:20+5:302016-04-07T10:00:46+5:30
भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ७ - १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या गीताचा ईधी फांऊडेशनच्या बिल्किस ईधींनी पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करून तिला गेल्या वर्षी सुखरूपरित्या मायदेशात पाठवले. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कराचीहून पळून आलेल्या 'मोहम्मद रमझान'ला मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच दिवसात त्याला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात येणार आहे. रमझानचे वडील काही वर्षांपासून बांग्लादेशमध्ये राहत असून त्याला तेथेच पाठवण्यात येईल.
'रमझान कोलतकात्याला रवाना झाला असून तेथून सनलाप या एनजीओच्या मदतीने त्याला बांगलादेशमध्ये त्याच्या वडिलांकडे धाडण्यात येईल' असे 'उमीद' या आश्रयघराच्या प्रमुख अर्चना सहाय यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून रमझान तेथेच रहात होता.
रमझान १० वर्षांचा असताना त्याचे वडील त्याला बांग्लादेशला घेऊन गेले आणि त्याची आईशी ताटातूट झाली. वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर रमजानची सावत्र आई त्याचा छळ करू लागली, या परिस्थितीला कंटाळून पाकिस्तानला आईकडे परत जाण्यासाठी रमझानने २०११ साली बांग्लादेशमधून पळ काढला आणि चुकून सीमा ओलांडून भारतात आला. अनेक राज्यात भटकलेल्या रमझानची २०१३ साली भोपाळ रेल्वे स्थानकावर एका रेल्वे पोलिस अधिका-याने चौकशी केली आणि अखेर त्याला 'चाईल्डलाइन' या संस्थेत पाठवले.
' आम्ही रमझानला पाकिस्तानात त्याच्या आईकडे पोचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांकडे परत पाठवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण भारतातून पाकिस्तानला जाण्यापेक्षा, बांग्लादेशमधून तेथे जाणे अधिक सोपे आहे' असेही सहाय म्हणाल्या.