संपकरी विद्यार्थ्यांवर २.१५ लाख खर्च केल्याने केंद्राची FTII प्रशासनावर वक्रदृष्टी
By admin | Published: September 17, 2015 11:59 AM2015-09-17T11:59:06+5:302015-09-17T11:59:06+5:30
गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात संपाचे व नंतर उपोषणाचे हत्यार उपसणा-या विद्यार्थ्यांवर FTII प्रशासनाने विमान प्रवासासाठी व वैद्यकीय खर्चापोटी तब्बल २.१५ लाख
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ - गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात संपाचे व नंतर उपोषणाचे हत्यार उपसणा-या विद्यार्थ्यांवर FTII प्रशासनाने विमान प्रवासासाठी व वैद्यकीय खर्चापोटी तब्बल २.१५ लाख रुपये खर्च केल्याने केंद्राची वक्रदृष्टी वळली आहे. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आणि त्यापोटी आलेले ३८ हजारांचे बिल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या प्रशासनाने भरले. तसेच केंद्रीय मंत्र्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाच्या विमानप्रवासासाठी १.८६ लाख रुपये, राहण्यापोटी २० हजार रुपये व स्थानिक प्रवासापोटी १८ हजार रुपयांचा खर्च FTII ने केला असून माहिती व प्रसारण खात्याने त्याचा जाब विचारला आहे. आता FTII विद्यार्थ्यांनी हे पैसे परत करावेत अशी मागणी करण्याच्या विचारात असल्याचे समजते.
केंद्राला उत्तर देताना, विद्यार्थी व सरकार यांच्यात असलेला तिढा मिटावा व त्यासाठी ही बैठक उपयोगाची ठरू शकत असल्याने चांगल्या विचाराने हा खर्च केल्याचे FTII च्या संचालकांनी सांगितले. परंतु, विद्यार्थ्यांना बैठकीसाठी केंद्राने बोलावले नव्हते आणि भारतभरातून FTII च्या माजी विद्यार्थ्यांना नेण्याची कल्पनाही विद्यार्थ्यांची होती, असे असताना हा भुर्दंड सरकारने का सोसावा असा प्रश्न माहिती व प्रसारण मंत्रालयाने उपस्थित केल्याचे वृत्त आहे. FTII चे संपकरी विद्यार्थी व केंद्र सरकार यांच्यामध्ये आधीच शक्तिप्रदर्शनाचे खेळ सुरू असताना या नव्या खर्चप्रकरणामुळे संबंध आणखी चिघळण्याची शक्यता आहे.