श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर सागरी सीमेवर हायअलर्ट, भारतीय तटरक्षक दल सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 05:46 PM2019-04-22T17:46:08+5:302019-04-22T17:48:34+5:30
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाने श्रीलंकानजीक असणाऱ्या सागरी सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोलंबो - श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तटरक्षक दलाने श्रीलंकानजीक असणाऱ्या सागरी सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. इतकचं नाही तर श्रीलंकेतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर दहशतवादी श्रीलंकेतून फरार होण्याच्या मार्गावर असल्याने भारतीय जहाज आणि सागरी सीमेचं रक्षण करण्यासाठी विमानांना तैनात ठेवण्यात आलं आहे.
दुसरीकडे अमेरिका आणि कॅनडा यांनी पर्यटकांना श्रीलंकेत जाण्याआधी सावधनता बाळगा अशी सूचना करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दूतावासाने सांगितले आहे की, दहशतवादी पर्यटन स्थळ, मार्केट, शॉपिंग मॉल, सरकारी परिसर, हॉटेल, क्लब, विमानतळ अशा ठिकाणांना दहशतवादी निशाणा बनवू शकतात. कॅनडा सरकारने देशातील नागरिकांना श्रीलंका दौरा जाण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नागरिकांनीच घ्यावा असा सल्ला दिला आहे.
अद्यापपर्यंत श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 24 संशयितांना अटक केली आहे. श्रीलंकेत झालेल्या या हल्ल्यामध्ये 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तसेच रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन सरकारने देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी केली आहे. आज रात्री मध्यरात्रीपासून श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू होणार आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना रविवारी श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते. या बॉम्बस्फोटात 290 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी https://t.co/m49z6FjHxr
— Lokmat (@MiLOKMAT) April 22, 2019
श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा भारतासह अमेरिका, ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपातील अन्य देशांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे.