श्रीदेवींच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांनी 'या' राजकीय नेत्याला केला होता पहिला फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 09:47 AM2018-02-27T09:47:04+5:302018-02-27T10:18:19+5:30
श्रीदेवी एखादवेळी बोनी कपूर यांचे म्हणणे टाळत, पण माझा सल्ला त्या नेहमी ऐकत, असेही अमरसिंह यांनी सांगितले.
नवी दिल्ली: अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूनंतर गेल्या काही तासांमध्ये या प्रकरणाने रंजक वळण घेतले आहे. कालपासून या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यामध्ये आता राजकीय चमत्कारांसाठी विख्यात असणारे समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला तेव्हा बोनी कपूर यांनी मला फोन केला होता. मात्र, तेव्हा मोबाईल सायलंटवर असल्यामुळे मी त्यांचा फोन उचलला नाही. माझ्या मते त्यांनी सर्वात पहिला फोन मलाच केला असावा. मी मोबाईल उचलत नसल्यामुळे त्यांनी माझ्या घरच्या लँडलाईनवर फोन केला. तो फोन उचलल्यानंतर बोनी कपूर यांनी मला श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल सांगितले. परंतु परिस्थितीच अशी होती की, आम्ही पुढे फार काही बोलू शकलो नाही, असे अमरसिंह यांनी म्हटले.
अमरसिंह हेदेखील मोहित मारवाह यांच्या विवाह सोहळ्याला दुबईत गेले होते. मात्र, लखनऊतील एका कार्यक्रमात हजेरी लावायची असल्याने हे दोघेही भारतात परतले होते. त्यामुळे श्रीदेवी दुबईत एकट्याच होत्या. मात्र, आता असे वाटतेय की, आम्ही तिकडे थांबलो असतो तर ही घटना टळू शकली असती. मात्र, मी यासाठी कोणालाही दोषी धरू इच्छित नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, श्रीदेवी यांच्या रक्तात मद्याचा अंश आढळून आल्याबद्दल विचारणा केली असता अमरसिंह यांनी म्हटले की, श्रीदेवी कधीतरी थोड्या प्रमाणात मद्यप्राशन करायच्या. परंतु, त्या कधीही मद्याचे अतिसेवन करत नसत, असे अमरसिंह यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी श्रीदेवी यांच्या शवविच्छेदनानंतर न्यायवैद्यक शाळेने दिलेल्या अहवालात त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे म्हटले आहे. यानंतर स्थानिक पोलिसांकडून हॉटेलमधील कर्मचारी आणि बोनी कपूर यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते.