दगडफेकीच्या घटनेनंतर भाजपच्या सचिवांना मिळाली 'झेड' सुरक्षा अन् 'बुलेट प्रूफ' गाडी
By मोरेश्वर येरम | Published: December 14, 2020 02:17 PM2020-12-14T14:17:08+5:302020-12-14T14:24:55+5:30
दगडफेकीच्या घटनेनंतर कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आता बुलेट प्रूफ गाडी देखील देण्यात आलीय.
कोलकाता
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सचिव कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. पश्चिम बंगाल दौऱ्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेकीची घटना घडली होती. विजयवर्गीय यांच्या गाडीवरही दगडफेक झाली होती. ज्यात विजयवर्गीय यांना दुखापत झाली होती.
दगडफेकीच्या घटनेनंतर कैलास विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करुन त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आता बुलेट प्रूफ गाडी देखील देण्यात आलीय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी नड्डा यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी दगडफेक केली होती. यात नड्डा यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पण कैलास विजयवर्गीय यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत विजयवर्गीय यांना दुखापत झाली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची जबाबदारी कैलास विजयवर्गीय यांना देण्यात आली आहे.
.@MamataOfficial की शह पर @WBPolice एक बार फिर झूठ बोल रही है। भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के काफिले पर सड़क के दोनों तरफ खड़ी भीड़ ने पथराव किया, उसमें पुलिस वाले भी खड़े थे। किसी ने भी हमलावरों को रोकने की कोशिश नहीं की।#MamataKillsDemocracyhttps://t.co/OpRQ0mNTQYpic.twitter.com/IJgZgVp5U1
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) December 10, 2020
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपलं मजबूत स्थान निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर भाजपकडून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममता सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही या घटनेचा सविस्तर अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध तृणमूल हे द्वंद्व पाहता अमित शहा देखील आता पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. येत्या १९ आणि २० डिसेंबर रोजी अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत.