सर्जिकलनंतर पोलिटिकल वॉर सुरू
By admin | Published: October 8, 2016 05:37 AM2016-10-08T05:37:50+5:302016-10-08T05:37:50+5:30
भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना.
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- २८ सप्टेंबरच्या रात्री भारतीय लष्कराने सीमापार जाऊन पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या धाडसी सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांचा वाद १० दिवसांनंतरही शमता शमेना. भाजपच्या नेतृत्वाने कितीही नकार दिला तरी याबाबीचे ते राजकीय भांडवल करण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेसने भाजपवर टीका करण्यापूर्वी १९७१ च्या युद्धाकडे जरा पाहावे, असा सल्लाही शहांनी दिला आहे. काही उत्साही भाजप जिल्हाध्यक्षांना याबाबत पोस्टरबाजी करण्यास त्यांनी मनाई केली आहे. मात्र, लष्कराच्या कारवाईमागे समर्थ राजकीय इच्छाशक्ती व पाठबळ होते, असे आश्चर्यकारक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. हे कमी म्हणून की काय, भाजपा या घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे, असे दिसते.
दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपला या सर्जिकल स्ट्राईकचा फायदा मिळू नये, यासाठी सरसावले आहेत. राहुल गांधी यांच्या खून की दलाली या वक्तव्यावरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली असल्याने विरोधकांतही गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसते.
भाजपच्या जाळ्यात काँग्रेसने अडकू नये, असे जनता दल (यू)सह काही मित्र पक्षांनी आवाहन केले आहे. प्रशांत किशोर म्हणतात की, या घडीला लष्कराची प्रशंसा करा आणि राजकीय टीका टाळा.
राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यासाठी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज पक्ष मुख्यालयात अचानकपणे पत्रकार परिषद घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांच्या रक्ताच्या मागे लपत असून, त्यांच्या बलिदानाचे राजकीय शोषण करीत असल्याचा आरोप राहुल यांनी गुरुवारी केला होता. सर्जिकल स्ट्राईकवरील विधानांवरून अरविंद केजरीवाल अडचणीत आले होते. त्यांच्यावर चोहीकडून टीकेचा भडिमार सुरू होता. राहुल यांच्या विधानांमुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला, असे म्हणता येईल. केजरीवाल यांनी सर्जिकलबाबत केलेली विधाने पाकिस्तानात गाजली. मात्र, त्यामुळे पंजाबमधील त्यांचे समर्थक चिंतातुर झाले आहेत.
>केवळ सैन्याचा सत्कार केला पाहिजे...
बसपाप्रमुख मायावती यांनीही या वादात उडी घेतली. सर्जिकल स्ट्राइकबाबत केवळ सैन्याचा सत्कार केला गेला पाहिजे ना की पंतप्रधान किंवा संरक्षणमंत्र्याचा, असे त्या म्हणाल्या. स्ट्राइकबद्दल मनोहर पर्रीकर यांचा गुरुवारी मथुरेत सत्कार करण्यात आला. मायावतींचा रोख त्याकडेच होता.
>पाकिस्तानचे भारताच्या नावाने बोटे मोडणे सुरूच
काश्मीरमधील जनतेवर सुरक्षा दलांकडून होणाऱ्या अन्याय व अत्याचारांचा निषेध करतानाच, आम्ही काश्मिरी जनतेच्या लढ्यात सोबत आहोत, कारण काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही आहे, असा ठराव शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेत एकमताने संमत करण्यात आला. काश्मीरमधील जनतेवरील अत्याचार रोखण्यास आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.