अपघातानंतर माजी आमदाराच्या मुलाने भलत्यालाच अडकवले, बिंग फुटताच झाला फरार, आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 08:52 AM2023-12-27T08:52:11+5:302023-12-27T08:55:25+5:30
Crime News: तेलंगाणामधील हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माजी आमदाराच्याच्या मुलाने रस्ते अपघातानंतर कायदेशीर कटकटीतून वाचण्यासाठी भलत्याच व्यक्तीला या प्रकरणात अडकवले.
तेलंगाणामधील हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका माजी आमदाराच्याच्या मुलाने रस्ते अपघातानंतर कायदेशीर कटकटीतून वाचण्यासाठी भलत्याच व्यक्तीला या प्रकरणात अडकवले. मात्र या प्रकाराचं बिंग फुटल्यावर तो फरार झाला आहे. आता पोलीस या फरार आमदार पुत्राचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोधन येथील बीआरएसचे माजी आमदार शकील यांचा पुत्र राहिल अमीर याने हैदराबादमधील प्रजा भवन येथे अपघात केला होता. त्यानंतर कायदेशीर बाबींमध्ये अडकण्यापासून वाचण्यासाठी त्याने ड्रायव्हर म्हणून कुठल्या तरी अन्य व्यक्तीलाच या प्रकरणात अडकवले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरले आणि त्याचे बिंग फुटले. तसेच या अपघातामध्ये राहिल याचाही सहभाग असल्याचे उघड झाले. हैदराबादचे डीसीपी विजय कुमार यांनी राहिल याचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. तो सध्या फरार आहे.
ही घटना २३ डिसेंबर रोजी रात्री घडली होती. आरोपी राहिल हा बीएमडब्ल्यू कार चालवत होता. त्यावेळी सीएम कॅम्प कार्यालयाच्या सुरुवातीच्या पॉईंटजवळ ही कार ट्रॅफिक बॅरिकेडवर आदळली. या अपघातात खूप नुकसान झालं होतं. या प्रकरणात सुरुवातील महाराष्ट्रातील कारचालक अब्दुल आसिफ याने अपघाताची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र नंतर सत्य परिस्थिती समोर आली.
पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्रातील कारचालक असलेल्या अब्दुल आसिफ याला आरोपी बनवलं होतं. मात्र मुख्य आरोपीची ओळख पटल्यानंतर आसिफ याला पंजागुट्टा पोलिसांनी अटक केली. राहिल आमिर हा अपङात झाला तेव्हा नशेत होता, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, राहिल आमिर याच्याजागी दुसऱ्याच व्यक्तीला या प्रकरणात अडकवल्याने हैदराबादचे पोलीस आयुक्त कोथाकोटा श्रीनिवास रेड्डी यांनी पंजागुट्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी बी. दुर्गा राव यांना निलंबित केले आहे.
राहिल आमीर याचं नाव अपघाताच्या प्रकरणात समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी २०२२ मध्ये तो अशाच एका घटनेमध्ये सापडला होता. तेव्हा ज्युबिली हिल्समध्ये एसयूव्हीमुळे झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला होता.