Asaduddin Owaisi Security: ओवेसी आता वापरणार बुलेट प्रूफ कार आणि मागणार हत्यार बाळगण्याची परवानगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 08:14 PM2022-02-04T20:14:00+5:302022-02-04T20:14:53+5:30
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली-
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीआधी AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ओवेसी यांनी त्यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा लोकसभेत दखील उचलला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ओवेसी यांनी केंद्र सरकारनं या हल्ल्यानंतर देऊ केलेली झेड दर्जाची सुरक्षा नाकारली आहे. ते स्वत: आता त्यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन दिल्लीत बुलेट प्रूफ कार वापरण्याची परवागनी मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आत्मरक्षणासाठी एक खास पद्धतीचं हत्यार बाळगण्याचीही परवागनी सरकारकडे मागणार असल्याचं ओवेसी यांनी एका टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
भ्याड हल्ल्यांना आपण घाबरत नाही असं म्हणत त्यांनी केंद्र सरकार देऊ करत असलेली झेड दर्जाची सुरक्षा नाकारली आहे आणि यातच ते उद्या पुन्हा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मी घाबरुन घरी बसणाऱ्यांमधला नाही, असं ओवेसी म्हणाले.
"देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. एखाद्या खासदाराच्या जीवाची किंमत गरीब माणसापेक्षा अधिक असू शकत नाही. केंद्र सरकार नेमकं कोणत्या गोष्टीसाठी मला सुरक्षा देऊ इच्छित आहे?", असा प्रतिसवाल यावेळी ओवेसी यांनी केला. ज्या लोकांनी माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यांचा गोळीवर विश्वास आहे. मतदानावर नाही. असे लोक ना संविधानावर विश्वास ठेवत ना न्यायपालिकेवर. कारण असे लोक पूर्णपणे कट्टरतावादी असतात, अशा लोकांना भाजपा काय रोखणार?, असंही ओवेसी म्हणाले.
ग्लॉक हत्यार बाळगण्याची परवानगी
जेव्हा माझ्या भोवती लोक हत्यारं घेऊन चालतात तेव्हा खूप घुसमट होते. माझ्या जीवाचं संरक्षण माझं मरणच करेल आणि जोवर अल्लाहची मर्जी होत नाही. तोवर माझा मृत्यू होणं शक्य नाही, असं ओवेसी म्हणाले. तसंच आपण गृह मंत्रालयाला पत्र लिहून बुलेट प्रूफ कार वापरण्याची परवानगी मागणार असल्याचं ओवेसी म्हणाले. ही कार स्वखर्चानं दिल्लीत ठेवणार असल्याचंही ते म्हणाले. यासोबतच ग्लॉक हत्यार सोबत बाळगण्याची परवानगी सरकारकडे मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.