पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:14 IST2025-04-23T10:14:24+5:302025-04-23T10:14:42+5:30
Encounter In Kashmir: पहलागम येथील हल्ल्यानंतर आज सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक उडाली असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे.

पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पहलागम येथील हल्ल्यानंतर आज सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक उडाली असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. दरम्यान, ही चकमक अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार काश्मीरमधील बारामुल्ला परिसरामध्ये दहशतवाद्यांकडून झालेला घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. लष्कराने दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार मारले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारुगोळा आणि इतर सामुग्री जप्त केली आहे.
J&K | Heavy exchange of fire between security forces and terrorists, two terrorists have been eliminated, infiltration bid foiled by the security forces in the ongoing Operation in Baramulla. Large quantity of weapons, ammunition and other war-like stores have been recovered from… pic.twitter.com/OS3opx8lLg
— ANI (@ANI) April 23, 2025
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील उरीमध्येही दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याने लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. भारतीय सैन्याने सांगितले की, बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. आज सुमारे २ ते ३ दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील उरी नाल्यातील सरजीवनच्या सामान्य भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराने सांगितले की, नियंत्रण रेषेवरील सतर्क सैनिकांनी घुसखोरांना आव्हान दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. सध्या चकमक सुरू आहे.