"त्यांनी योग्य केले असं..."; सुवर्ण मंदिरातील गोळीबारानंतर आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 05:17 PM2024-12-04T17:17:02+5:302024-12-04T17:24:36+5:30

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या चौराच्या पत्नीने या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

After the attack on Sukhbir Badal police interrogation of Narain Singh Chaura wife continues | "त्यांनी योग्य केले असं..."; सुवर्ण मंदिरातील गोळीबारानंतर आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"त्यांनी योग्य केले असं..."; सुवर्ण मंदिरातील गोळीबारानंतर आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

Narain Singh Chaura : शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर सुवर्ण मंदिरात झालेल्या हल्ल्याने संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील आरोपी नारायण सिंह चौरा याला तात्काळ पकडून पोलीस संरक्षणात ता्यात घेण्यात आलं आहे. सुखबीरसिंग बादल हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. दुसरीकडे पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून नारायण सिंह चौरा याच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली आहे. नारायण सिंह चौराच्या पत्नीने या सगळ्या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

श्री हरमंदिर साहिब अमृतसरमध्ये शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर  मंदिरात सेवा देत असताना गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी नारायण सिंग चौरा याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर चौरा याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली. पत्रकार आमच्या दारात येईपर्यंत काय झाले ते मला काहीच माहिती नव्हते अशी प्रतिक्रिया नारायण सिंग चौराच्या पत्नी जसप्रीत कौर यांनी दिली आहे.

"अमृतसरमध्ये वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहायचे आहे असे त्यांनी आज सकाळी सांगितले होते. पत्रकार आमच्या दारात येईपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. त्यांनी जे केले ते मला योग्य वाटत नाही," असं जसप्रीत कौर यांनी म्हटलं.

सुखबीर बादल हे सुवर्ण मंदिरात सेवादार म्हणून सेवा करत होते. माध्यमांच्या फुटेजमध्ये चौरा यांनी बादल यांच्या जवळ जाऊन खिशातून पिस्तूल काढून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच पकडले. त्यावेळी झाडलेली गोळी भिंतीला लागली आणि सुखबीर बादल थोडक्यात बचावले.

अमृतसरचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौरा हा दहशतवादी असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. नारायण चौरा १९८४ मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांच्या मोठ्या खेपांची तस्करी करण्यात त्याचा हात होता. पाकिस्तानमध्ये राहून त्यांने गनिमी युद्ध आणि देशद्रोहाचे साहित्य यावर एक पुस्तकही लिहिले आहे. बुडैल जेलब्रेक प्रकरणातीलही तो आरोपी आहे.  नारायण सिंह चौराला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. हल्ल्यात वापरलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: After the attack on Sukhbir Badal police interrogation of Narain Singh Chaura wife continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.