मृत मुलगा जिवंत राहण्यासाठी लष्कराच्या जवानाने घेतला असा निर्णय; वाचले अनेकांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 12:37 IST2025-02-19T12:33:43+5:302025-02-19T12:37:42+5:30
भारतीय सैन्यातील हवालदाराने मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान करत सहा जणांना नवजीवन दिलं आहे.

मृत मुलगा जिवंत राहण्यासाठी लष्कराच्या जवानाने घेतला असा निर्णय; वाचले अनेकांचे प्राण
Organ Donation: अवयव दान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याचे म्हटलं जातं. अवयव दान करणारी व्यक्तींच्या कहाण्या देखील अनेकदा प्रेरणादायी असतात. एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात वेदना देणारा क्षण एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणं हा असतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेते तेव्हा जास्त त्रास होतो. भारतीय लष्कराच्या एका सैनिकाने या दोन्ही वेदना एकत्र पाहिल्या आणि सहन केल्या आहेत. मुलाच्या अकाली मृत्यूनंतर लष्कराच्या एका हवालदाराने अवयवदानाचे पाऊल उचलून माणुसकीचे एक उदाहरण तयार करत सहा जणांना जीवनदान दिलं आहे.
भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटच्या १० व्या बटालियनचे हवालदार नरेश कुमार यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करून अनेक गरजूंना मदत केलीय. या निर्णयातून त्यांचे धैर्य, निःस्वार्थ सेवा आणि मानवता दिसून येतेय. रस्ते अपघातात मुलगा गमावल्यानंतरही नरेश कुमार यांनी हिंमत दाखवली आणि अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. यकृत, किडनी, स्वादुपिंड आणि कॉर्निया दान करून त्यांनी आपल्या मुलाच्या आठवणी जिवंत ठेवत गरजूंना जीवनदान दिलं.
८ फेब्रुवारी रोजी, हवालदार नरेश कुमार यांचा मुलगा अर्शदीप सिंह याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. १८ वर्षांचा मुलाचा जीव जाणं हे नरेश कुमार यांच्यासाठी जगातील कोणत्याही दुःखापेक्षा मोठं होतं. मात्र यानंतरही न खचता नरेश कुमार यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. १६ फेब्रुवारी रोजी त्यांनी अर्शदीपचे यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड आणि कॉर्निया दान करण्यास सहमती दर्शवली. अर्शदीपचे यकृत आणि मूत्रपिंड ग्रीन कॉरिडॉरमधून नवी दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. एका रुग्णाला किडनी आणि स्वादुपिंड देण्यात आले. जो मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या आजाराने बराच काळ ग्रस्त होता.
अर्शदीपचे कॉर्निया गरजूंसाठी जतन करुन ठेवण्यात आलं आहे. चंडीमंदिर येथील कमांड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ पथकाने ही प्रक्रिया पार पाडली. हे रुग्णालय अवयव प्रत्यारोपण आणि अवयव दानासाठी ओळखले जाते. हवालदार नरेश कुमार यांनी घेतलेला हा निर्णय सहा जणांना नवजीवन देणार आहे.