चकमकीनंतर अंधारात दहशतवादी पळाले; दोन जवान झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:44 AM2023-07-29T11:44:57+5:302023-07-29T11:45:11+5:30

मणिपूरमधील विष्णपूर जिल्ह्यात दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले.

After the encounter, the terrorists fled in the dark Two soldiers were injured | चकमकीनंतर अंधारात दहशतवादी पळाले; दोन जवान झाले जखमी

चकमकीनंतर अंधारात दहशतवादी पळाले; दोन जवान झाले जखमी

googlenewsNext

इम्फाळ : मणिपूरमधील विष्णपूर जिल्ह्यात दहशतवादी व सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले. फौबकचाओ इखाई या भागात गुरुवारी सकाळी सुरू झालेला हा गोळीबार सुमारे १५ तास सुरू होता. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून गेले.

दोन जखमींमध्ये मणिपूर पोलिस कमांडो नेमीरकपम इबोम (वय ४० वर्षे) याचा समावेश आहे. जखमी झालेला दुसरा एकजण लष्करातील कुमाऊँ रेजिमेंटचा जवान असून त्याचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. या चकमकीत दहशतवाद्यांपैकी काहीजण जखमी किंवा मरण पावल्याची शक्यता सुरक्षा दलाने व्यक्त केली आहे. 

धिंड प्रकरणीच्या याचिकेची सुनावणी होऊ शकली नाही

मणिपूरमध्ये ४ मे रोजी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड उपलब्ध नसल्यामुळे शुक्रवारी होऊ शकली नाही. धिंड प्रकरणासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर केलेल्या उत्तरावर चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ विचार करणार होते. (वृत्तसंस्था)

सीबीआयकडून कोणालाही अटक नाही

महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणी  सीबीआयने अद्याप एकालाही अटक केलेली नाही. मणिपूर पोलिसांनी धिंड काढण्याचे कृत्य करणाऱ्यांपैकी सहाजणांना याआधीच अटक केली आहे. सीबीआय योग्य दिशेने तपास करत असून आणखी आरोपींवर कारवाई करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. 

मणिपूर हिंसाचाराचा लंडनमध्ये निषेध

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी लंडन येथे भारतीय वंशाच्या महिलांच्या दी वुमन ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया सपोर्ट नेटवर्क (डब्ल्यूएनईएसएन) या संघटनेने मूक मोर्चा काढला. त्यात सहभागी झालेल्या स्त्री-पुरुषांनी तोंडाला मास्क लावले होते. मणिपूरमधील पर्वतीय भागातील जिल्ह्यांमध्ये कुकी-झो जमातीसाठी स्वतंत्र प्रशासन असावे, या मागणीसाठी कुकी-झो वुमन्स फोरमने दिल्ली येथील जंतरमंतर येथे शुक्रवारी निदर्शने केली.

‘इंडिया’चे २० खासदार मणिपूरला

‘इंडिया’ या विरोधी आघाडीतील घटक पक्षातील २० खासदार या आठवड्याच्या शेवटी आगीने धुमसत असलेल्या मणिपूरला भेट देणार असून, येथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते हिंसाचारग्रस्त राज्यातील समस्या सोडविण्यासाठी सरकारला आणि संसदेत आपल्या शिफारसी देतील. या विरोधी खासदारांचे शिष्टमंडळ २९-३० जुलै रोजी मणिपूरला भेट देणार आहे. 

लोकसभेत पुन्हा गदारोळ

मणिपूरच्या मुद्द्यावरून लोकसभेत शुक्रवारीही गदारोळ झाला. सभागृहाचे कामकाज एकदा तहकूब करण्यात आल्यानंतर पुन्हा ते सोमवारी सकाळी ११ पर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधी सदस्यांच्या जोरदार घोषणाबाजीत सभागृहाने तीन विधेयके मंजूर केली. काँग्रेस आणि विरोधी आघाडी ‘इंडिया’चे इतर घटक पक्ष पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी करत आहेत. पंतप्रधानांनी या विषयावर संसदेत निवेदन करावे, अशी त्यांची मागणी आहे.

Web Title: After the encounter, the terrorists fled in the dark Two soldiers were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.