महागड्या वंदे भारतनंतर परवडणारी वंदे साधारण! चेन्नईच्या फॅक्टरीतून फोटो लीक झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 01:55 PM2023-09-13T13:55:50+5:302023-09-13T13:56:06+5:30
वंदे भारत ट्रेनची किंमत १०० कोटी सांगितली जाते. तर या ट्रेनची किंमत ६५ कोटी रुपये असणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसने भारतीय रेल्वेचा चेहरा बदलला आहे. एक हायफाय आणि फास्ट रेल्वे देशभरातील वेगवेगळ्या मार्गांवर आता धावत आहे. परंतू, या रेल्वेचे तिकीट काही सामान्यांना परवडणारे नाहीय. यामुळे भारतीय रेल्वेने सामान्यांसाठी वंदे भारत रेल्वे सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे.
भारत सरकारने सामान्यांना परवडेल अशी वंदे साधारण रेल्वे आणण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचे उद्दीष्ट बजेट फ्रेंडली तिकीट दरांमध्ये प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे आहे. या नावाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. परंतू सामान्यांना परवडेल अशी रेल्वे तयार करण्यासाठी रेल्वे डिझाईन करण्यात आली आहे. या रेल्वेत काय सुविधा असतील चला पाहुयात...
अधिकृत लाँचिंगपूर्वीच या रेल्वेचा लुक सोशल मीडियावर लीक झाला आहे. ट्रेनचे उत्पादन चेन्नईतील कोच फॅक्टरीमध्ये होत आहे. या ट्रेनसाठी आजवर ६५ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. ही ट्रेन या वर्षीच्या अखेरीस सुरु केली जाऊ शकते. वंदे भारतच्या तुलनेत या ट्रेनचा प्रवास स्वस्त असणार आहे.
या ट्रेनला २४ कोच असणार आहेत, तसेच दोन इंजिन लावण्यात येणार आहेत. फोटोंवरून या ट्रेन भगव्या आणि ग्रे रंगात असणार आहेत. याच्या दोन्ही टोकांना लोकोमोटिव्ह सुविधा आहेत, ज्यामुळे ती इतर गाड्यांपेक्षा वेगवान ट्रेन बनते आणि खूप किफायतशीर देखील आहे. यात २४ एलएचबी कोच असतील ज्यात बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि चार्जिंग पॉइंट्स या वैशिष्ट्यांसह डिझाइन केले जाईल.
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार असून त्यात स्वयंचलित दरवाजाची व्यवस्थाही असणार आहे. या गाड्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यांचा वेग मेल आणि एक्स्प्रेसपेक्षा जास्त असेल आणि थांबेही कमी असतील. वंदे भारत प्रमाणेच याला स्वयंचलित दरवाजे दिले जाणार आहेत, जे ट्रेन सुरु होण्यापूर्वी बंद होतील.
वंदे भारत ट्रेनची किंमत १०० कोटी सांगितली जाते. तर या ट्रेनची किंमत ६५ कोटी रुपये असणार आहे. या ट्रेन खासकरून युपी, बिहार, छत्तीसगढ, झारखंड आणि ओमडिशासारख्या राज्यांमध्ये वापरल्या जाणार आहेत. याद्वारे प्रवासी मजूर व इतर लोक प्रवास करू शकणार आहेत.