"जो न्यायासाठी लढतो त्याच्यासोबत...", चंद्रशेखर आझाद यांची भेट घेतल्यानंतर पैलवानांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:15 PM2023-06-29T15:15:20+5:302023-06-29T15:16:13+5:30
Bhim Army Chief Chandrashekhar Azad : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी अज्ञातांनी गोळीबार केला.
Chandrashekhar Azad Attack : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील देवबंद इथे बुधवारी अज्ञातांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आझाद थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळ्या झाडल्या असता त्यातील एक गोळी आझाद यांना स्पर्श करून गेली. चंद्रशेखर यांच्यावर सहारनपूर येथील इस्पितळात उपचार सुरू असून पैलवान बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी तिथे जाऊन त्यांची विचारपूस केली आहे.
पुनिया आणि मलिक या दोन्ही पैलवानांनी इस्पितळात जाऊन आझाद यांच्या तब्येतीची विचारपूस केली. बजरंग पुनियाने चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत म्हटले, "जो सत्यासाठी, न्यायासाठी लढत आहे, त्यांच्यासोबत हे असेच होत आहे. प्रत्येक समाजातील लोक आज त्यांच्यासोबत उभे आहेत. चंद्रशेखर हे प्रत्येक आंदोलनात पुढाकार घेत असतात."
जीवघेण्या हल्ल्यात थोडक्यात बचावले
दरम्यान, चंद्रशेखर आझाद यांच्यावर बुधवारी अज्ञातांनी गोळीबार केला. उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या देवबंद येथे पोहचताच भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या हल्ल्यात आझाद जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. चंद्रशेखर हे त्यांच्या खासगी वाहनाने देवबंद दौऱ्यावर जात होते. तेव्हा अचानक अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांना दुखापत झाली असून गाडीवर देखील गोळ्यांचे निशाण दिसत आहेत.
चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना उघड पाठिंबा दिला होता. त्यांनी स्वत: आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक पैलवानांची भेट घेतली आणि सरकारने पैलवानांचे ऐकले नाही, तर भीम आर्मीही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आंदोलन करेल, असे म्हटले होते. दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. चंद्रशेखर आझाद यांच्यावरील हल्ल्याबाबत समाजवादी पार्टी, आरएलडी आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेश सरकार तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.