निकालानंतर भ्रष्टांचा मुक्काम असेल तुरुंगात, पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:20 PM2024-05-20T13:20:34+5:302024-05-20T13:21:21+5:30
पुरुलिया, बिष्णुपूर येथे मोदींच्या रविवारी प्रचारसभा झाल्या. दोन्ही ठिकाणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
पुरुलिया/बिष्णुपूर (पश्चिम बंगाल) : कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला सोडले जाणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे. ४ जूनला नवे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचा मुक्काम तुरुंगात असेल आणि उर्वरित आयुष्य ते तेथेच व्यतित करतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. पुरुलिया, बिष्णुपूर येथे मोदींच्या रविवारी प्रचारसभा झाल्या. दोन्ही ठिकाणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
पुरुलिया येथे बोलताना त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघाविरोधात केलेल्या टिप्पण्यांचा निषेध केला. तृणमूल काँग्रेसने शालीनतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ते इस्कॉन, रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघाविरुद्ध अफवा पसरवत आहेत. भ्रष्टाचाराबाबत तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काँग्रेस नेत्यांच्या घरी घबाड सापडले तसेच तृणमूल काँग्रेसच्या नेत्याकडेही रोख रक्कम सापडली आहे़त. कोणत्याही भ्रष्टाला सोडले जाणार नाह. तर, काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत असल्याने कोणताही उद्योगपती काँग्रेसशासित राज्यांत गुंतवणूक करण्यापूर्वी पन्नास वेळा विचार करील, अशी टीका माेदींनी जमशेदपूर येथील सभेत केली.
‘इंडी’ आघाडी फक्त आपल्या कुटुंबासाठी राजकारण करते : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना सांगितले की, विरोधकांची संपूर्ण ‘इंडी’ आघाडी आपल्या मुला-मुलींसाठी राजकारण करते. लालू यादव, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचे आहे.
अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार नीरज त्रिपाठी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले, ‘जे आपल्या मुला-मुलींसाठी राजकारण करतात, ते तुमचे भले करतात का? ‘इंडी’ (इंडिया) आघाडी म्हणते की, त्यांचे सरकार आल्यास ते कलम ३७० पुन्हा लागू करतील, तिहेरी तलाक परत आणतील, सीएए काढून टाकतील. ही घराणेशाहीची समर्थक ‘इंडी’ आघाडी देशाला पुढे नेऊ शकत नाही.’