महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रं जमा करुन घेता येणार नाहीत- जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 09:28 PM2018-10-10T21:28:10+5:302018-10-10T21:29:25+5:30
प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून शुल्क परत मिळणार
नवी दिल्ली: आता कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयात प्रवेश घेताना मूळ प्रमाणपत्रं द्यावी लागणार नाहीत. याशिवाय यापुढे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रं स्वत:कडे ठेवता येणार नाहीत. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यास त्यांना शुल्कदेखील परत मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना महाविद्यालयांकडून त्यांची मूळ प्रमाणपत्रं घेतली जायची. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर ही प्रमाणपत्रं महाविद्यालयाकडे जमा करावी लागायची. मात्र यापुढे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयं साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट) प्रमाणपत्रं द्यावी लागतील. ही प्रमाणपत्रं महाविद्यालयांकडून मूळ सोबत पडताळून पाहिली जातील. यानंतर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्रं परत करावी लागतील. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे यासंबंधी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.
जर विद्यार्थ्यानं एखाद्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करुन दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला, तर महाविद्यालयाला त्यानं भरलेलं शुल्क परत करावं लागेल, अशी महत्त्वपूर्ण माहिती जावडेकर यांनी दिली. प्रवेश प्रक्रिया बंद होण्याच्या 16 दिवस अगोदर प्रवेश रद्द केल्यास 100 टक्के शुल्क परत मिळेल. तर प्रकिया बंद होण्याच्या 15 दिवस आधी प्रवेश रद्द केल्यास 90 टक्के शुल्क परत केलं जाईल. प्रवेश घेतल्यानंतर महिन्याभरात तो रद्द केल्यास 50 टक्के शुल्क परत मिळेल. या नियमांचं पालन न केल्यास महाविद्यालयांना दंड ठोठावला जाईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.