मतदानानंतर शाई नव्हे, लेझर मार्क! निवडणूक आयाेगाची शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 05:41 AM2023-05-22T05:41:11+5:302023-05-22T05:41:31+5:30
‘एआय’चा वापर, फोटोही काढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे.
यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते. त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. लेझर तंत्रज्ञानामुळे हेराफेरी थांबेल. अनेक दिवस लेझरने बनविलेले चिन्ह काढणे जवळपास अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर ईव्हीएममध्ये कॅमेराही बसविण्यात येणार आहे, जो मतदाराचा फोटो टिपेल. या यंत्रणेचा वापर झाल्यास शाईचा वापर कालबाह्य होऊ शकतो.
शाई असते महाग
मतदानासाठी बाेटांवर लावण्यात येणाऱ्या शाईत चांदी असलेले एक सिल्व्हर नायट्रेट हे रसायन वापरले जाते. चांदीचा वापर केल्यामुळे ही शाई महाग असते
असा बसेल बोगस मतदानाला आळा
लेझर स्पॉट केल्यानंतर ती व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आली तर ती पकडली जाईल.
दुसरीकडे, ईव्हीएममध्ये बसविण्यात आलेला कॅमेरा एआय तंत्रज्ञानाने पुन्हा मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओळखून निवडणूक अधिकाऱ्याला अलर्ट पाठवेल.
सर्वप्रथम वापर कधी ?
मतदानामध्ये विशिष्ट शाईचा वापर भारतात सर्वप्रथम १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत करण्यात आला हाेता. त्यानंतर आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत याचा वापर करण्यात आलेला आहे.
म्हैसूर पेंट्स ॲण्ड वार्निश लिमिटेड ही एकमेव कंपनी ही शाई तयार करते. यासाठी राष्ट्रीय फिजिकल लेबाॅरेटरी ऑफ इंडिया आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कार्पाेरेशनने कंपनीसाेबत करार केला आहे. महाराज कृष्णराजा वडियार चतुर्थ यांनी १९३७ मध्ये कंपनीची स्थापना केली हाेती.
२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत शाईच्या २६ लाख बाटल्यांची ऑर्डर निवडणूक आयाेगाने दिली हाेती. त्यासाठी ३३ काेटी रुपये देण्यात आले हाेते. साधारणत : ३५० मतदारांसाठी एक बाटली पुरते.
वर्ष शाईच्या बाटल्या
२००९ २० लाख
२०१४ २१.५ लाख
२०१९ २६ लाख