तृणमूल-भाजपच्या संघर्षामुळे संसार मोडणार?; पत्नीला तलाक देणार भाजप खासदार
By कुणाल गवाणकर | Published: December 21, 2020 04:34 PM2020-12-21T16:34:22+5:302020-12-21T16:35:32+5:30
भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल तृणमूलमध्ये
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देण्यासाठी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. गृहमंत्री अमित शहांनी नुकताच राज्याचा दौरा केला. या दरम्यान तृणमूलच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे.
भाजपनं तृणमूलचे अनेक आमदार गळाला लावल्यानंतर आता तृणमूलनं भाजपच्या घरात सर्जिकल स्ट्राईक केला आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांनी आज तृणमूलमध्ये प्रवेश केला. सौमित्र लोकसभेत बिशुनपूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. पत्नीनं तृणमूलमध्ये प्रवेश करताच सौमित्र यांनी तलाकची तयारी सुरू केली आहे.
West Bengal: BJP MP Saumitra Khan's wife Sujata Mondal Khan joins Trinamool Congress in Kolkata. pic.twitter.com/xBukTrfEWB
— ANI (@ANI) December 21, 2020
पती भाजपचे खासदार असतानाही तृणमूलमध्ये प्रवेश करत असल्याचं कारण सुजाता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 'मी दलित समाजातील एक महिला आहे. भाजप आणि माझ्या पतीसाठी मी संघर्ष केला. आम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि आम्ही निवडणूक जिंकलो. मात्र आता भाजपमध्ये केवळ संधीसाधूंची भरती सुरू आहे,' अशा शब्दांत सुजाता यांनी भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या जोरदार इनकमिंगवर निशाणा साधला.
भाजपच्या गोटात ममता बॅनर्जींचा सर्जिकल स्ट्राईक; खासदाराची पत्नी तृणमूलमध्ये
'ज्यावेळी भाजपचे राज्यात केवळ २ खासदार होते, त्यावेळी आम्ही पक्षासोबत ठामपणे उभे होतो. पक्ष २ वरुन १८ वर पोहोचले हेदेखील त्यावेळी आम्हाला माहीत नव्हतं. आमच्याकडे कोणताहा बॅकअप नसताना आम्ही लढलो आणि जिंकलो. मात्र तरीही पक्षात मला कोणताही सन्मान मिळाला नाही,' असं सुजाता म्हणाल्या.
सुजाता यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करताच सौमित्र खान यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी सुजाता यांना तलाक देण्याची तयारी सुरू केली आहे. सुजाता यांच्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. सुजाता आणि सौमित्र यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज तो समोर आल्याचं बोललं जात आहे. यावर सौमित्र यांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं. 'आमच्या कुटुंबात मतभेद होते. कुटुंबात थोडे वाद असूच शकतात. मला त्याला राजकीय रंग द्यायचा नाही. सुजाता तृणमूलमध्ये सामील झाल्या याबद्दल मला दु:ख वाटतं,' असं सौमित्र म्हणाले.