पुन्हा धाड, लखनौमधून 50 किलो सोनं अन् 5 कोटी रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:28 AM2018-07-18T11:28:45+5:302018-07-18T11:29:44+5:30
प्राप्तीकर विभागाकडून देशातील विविध भागात धाडसत्र मोहिम सुरू आहे. सोमवारी तामिळनाडूतील एका धाडीत तब्बल 100 किलो सोनं आणि 163 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती.
लखनौ - प्राप्तीकर विभागाकडून देशातील विविध भागात धाडसत्र मोहिम सुरू आहे. सोमवारी तामिळनाडूतील एका धाडीत तब्बल 100 किलो सोनं आणि 163 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर, आता लखनौ येथील एका धाडीत 50 किलोपेक्षा अधिक सोनं आणि 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लखनौचे व्यापारी कन्हैयालाल रस्तोगी यांच्या कंपनीच्या 6 पेक्षा अधिक ठिकाणांवर आयटी विभागाने ही धाड टाकली होती.
प्राप्तीकर विभागाने मंगळवारी लखनौमध्ये धाडसत्र मोहिम राबवली. या धाडीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 किलो सोनं आणि 5 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. येथील टॅक्स चोरीप्रकरणाची माहिती मिळताच, प्राप्तीकर विभागाने राजा बाजार परिसरातील कन्हैयालाल रस्तोगी यांच्या घरी छापा मारला. त्यानंतर, पथकाने मवाना मार्केटच्या कॉम्प्लेक्समध्येही धाड टाकली. या छापेमारीत प्राप्तीकर विभागाने मोठ्या प्रमाणात कागदपत्रेही हस्तगत केली आहेत. दरम्यान, या धाडीसाठी लखनौ प्राप्तीकर विभागातील विभागातील 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी हजर राहिले होते.