पुन्हा ‘द्रोह’राडा; कन्हय्यावर हल्ला

By admin | Published: February 18, 2016 07:12 AM2016-02-18T07:12:33+5:302016-02-18T07:12:33+5:30

जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हय्या कुमारची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा बुधवारी पतियाळा कोर्टात आणले असता, तेथील वकिलांनी त्याला आणि काही पत्रकारांना मारहाण व धक्काबुक्की केली

Again 'Draha' Rada; Attack on Kanhaiya | पुन्हा ‘द्रोह’राडा; कन्हय्यावर हल्ला

पुन्हा ‘द्रोह’राडा; कन्हय्यावर हल्ला

Next

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हय्या कुमारची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला पुन्हा बुधवारी पतियाळा कोर्टात आणले असता, तेथील वकिलांनी त्याला आणि काही पत्रकारांना मारहाण व धक्काबुक्की केली. या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत सुप्रीम कोर्टाने थेट दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना कन्हय्या कुमारला सुरक्षा देण्यास तुम्ही समर्थ आहात, की तुम्हाला न्यायालयाचे आदेश हवेत, असाच सवाल केला. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून पतियाळा कोर्टातील प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ वकिलांच्या पथकावरही दगडफेक झाल्याने न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.
बुधवारी दुपारी पटियाला हाऊ स कोर्टाच्या आवारात कन्हय्या कुमारला आणण्यात आले, तेव्हा कोर्टाच्या आवारात आणि कोर्टाबाहेर तुफान गर्दी जमली होती. अशा तणावपूर्ण वातावरणात वकिलांच्या एका जमावाने कन्हैय्यावर लाथा बुक्क्यांनी हल्ला चढवला. पोलीसांनी त्याला वाचवले, मात्र हा प्रसंग ते टाळू शकले नाहीत. त्यापूर्वी तारिक अन्वर नामक एका पत्रकारांवरही वकिलांच्या या जमावाने हल्ला चढवला. तारिकच्या म्हणण्यानुसार मारहाणीच्या वेळी पोलीस उपस्थित असूनही त्यांनी मूकदर्शकाची भूमिका बजावली. ‘देशद्रोह्यांना फाशी द्या’ घोषणा देणाऱ्या वकिलांचा एक गट मग वकिलांच्या दुसऱ्या गटाशी भिडला. दोन्ही गटांत बाचाबाचीही झाली. त्यानंतर कन्हय्याला मारहाण करणाऱ्या जमावाने आनंदही व्यक्त केला. या कोर्टाबाहेर ठराविक पत्रकारांनाच परवानगी द्यावी आणि प्रत्यक्ष न्यायालयातही संबंधित वकिलांनाखेरीज इतरांना मज्जाव करावा, अशा सूचना असूनही हा प्रकार घडला.
ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी या लाजिरवाण्या घटनेची माहिती सुप्रीम कोर्टाला देताच, चिंताग्रस्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी तडकाफडकी पोलीस आयुक्त बस्सींना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाने कन्हय्याच्या सुरक्षेबाबत अगोदरच आदेश जारी केले होते. त्याचे पोलीसांकडून पालन का झाले नाही, असा जाबही बस्सींना विचारण्यात आला. न्यायमूर्तींनी मग पटियाला हाऊस कोर्टाच्या आवारात नेमके काय घडले, याचा शोध घेण्यासाठी पाच ज्येष्ठ वकिलांचे एक पथक घटनास्थळी पाठवले. त्यात कपिल सिब्बल, राजीव धवन, दुष्यंत दवे आदी ज्येष्ठ वकिलांचा समावेश होता. पण पतियाळा हाऊ स कोर्टापाशी असलेल्या जमावाने ज्येष्ठ वकिलांच्या पथकावरही दगडफेक केली. सुदैवाने त्यात कोणी जखमी झाले नाही. हे पथक आपला अहवाल न्यायालयाला सादर करणार आहे.
पोलीस आयुक्त बस्सी यांच्यासाठी आजचा दिवस खूपच त्रासदायक ठरला. ते सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावत होते. सकाळी पंतप्रधान मोदींची बस्सींनी भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणाच्या तपासाचा तपशील सांगितला. मात्र ते या प्रकरणात भलतेच अडचणीत आल्याचे दिसत आहे.
कन्हय्या कुमार, जेएनयूचे विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार यांना मारहाण करणाऱ्या गटाचा मास्टरमार्इंडचा शोध लागला असून त्याचे नाव अ‍ॅड.विक्रमसिंग चौहान आहे. कन्हय्याच्या सुनावणीत अभाविपचे म्हणणेही ऐकले जावे, असा पटियाला कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या अ‍ॅड.चौहान यांचा आग्रह होता. न्यायालयाच्या आवारात आपण हल्ला चढवल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्यांविषयी आपल्या मनात संताप असून, प्रत्येकाला अशीच अद्दल घडवण्यासाठी आपणच अनेकांना कोर्टात बोलावले आणि हा हल्ला चढवला असे चौहानने मान्य केल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला आहे. अ‍ॅड. चौहानने सोशल मीडियावर गृहमंत्री राजनाथसिंग, भाजपचे २ प्रमुख प्रवक्ते, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांबरोबरची आपली छायाचित्रे पोस्ट केली आहेत. दिल्ली पोलीसांनी मात्र चौहानविरूद्ध कारवाई केली नाही. कोर्टाच्या आवारात सकाळपासून जे हिंसक प्रकार घडले त्यामुळे दिल्ली व देशाच्या अनेक भागांत संतापाची लाट उमटली असून हल्ल्याचा निषेध करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व स्वयंसेवी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान दिल्ली पोलीसांनी जेएनयु परिसरात राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या संशयित विद्यार्थ्यांच्या धरपकडीसाठी दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश आणि श्रीनगरमधे काही ठिकाणी छापे टाकले आहेत. मुख्यत्वे डेमॉक्रटिक स्टुडंटस युनियन (डीएसयू)या अतिडाव्या संघटनेच्या उमर खालिदचा शोध पोलीस घेत आहेत.
कन्हय्याच्या भाषणामध्ये देशद्रोहासारखे विधान नाही वा त्याने राष्ट्रद्रोही घोषणाही दिल्याचे पुराव्यातून दिसत नाही, असा अहवाल इंटलिजन्स ब्युरोने गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दिला आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक करण्यात अतिउत्साहच दाखवला, असेही ब्युरोच म्हणणे आहे. त्यामुळे केंद्र सरकारचीही अडचण झाली असून, त्याबद्दल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते.
>>>>>> कोर्टाने कन्हय्या कुमारला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. मात्र बाहेरील तणावाचे वातावरण पाहून पोलिसांनी त्याला पतियाळा हाऊ स न्यायालयातच बसवून ठेवले होते. संध्याकाळी उशिरा त्याची तिहार कारागृहात रवानगी केली. तिहारच्या तुरुंगात स्वतंत्र सेलमधे त्याला अत्यंत कडक सुरक्षेत २ मार्चपर्यंत कन्हय्या कुमारला ठेवले जाईल.
त्याच्या जामिनाला आम्ही विरोध करणार नाही, असे सांगत दिल्ली पोलीसांनीही जणू माघार घेतली आहे. आपला भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे, जेएनयूच्या आवारात ९ फेब्रुवारी रोजी दिल्या गेलेल्या घोषणांचाआपण तीव्र निषेध करतो, अशा राष्ट्रद्रोही प्रवृत्तींना आपला अजिबात पाठिंबा नाही, असे निवेदन कन्हय्या कुमारने प्रसिद्धीस दिले असून, जेएनयूमधील विद्यार्थ्यांनाही शांत राहण्याचे आवाहन त्याने केले आहे.
गुप्तचर यंत्रणांनी आपले कन्हय्याच्या अटकेविरोधात मत व्यक्त केले असले तरी आमच्याकडे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा, पुढे काय काय घडते, ते पाहत राहा, असे बस्सी यांनी सांगितले.

Web Title: Again 'Draha' Rada; Attack on Kanhaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.