पुन्हा 26/11 हल्ल्याचा तपास करा, भारताने पाकिस्तानला सुनावलं
By Admin | Published: March 2, 2017 08:51 AM2017-03-02T08:51:18+5:302017-03-02T08:51:18+5:30
भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा तपास करत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करायला सांगितलं आहे
>ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 2 - भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा तपास करत जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदवर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करायला सांगितलं आहे. पाकिस्तानने भारताकडे 24 साक्षीदारांना जबाब नोंदवण्यासाठी पाठवण्याचा आग्रह केल्यानंतर भारताने ही नवीन मागणी केल्याचं पाकिस्तान गृहमंत्रालयाच्या अधिका-याने सांगितलं आहे.
अधिका-याने सांगितलं आहे की, 'आम्ही पाठवलेल्या पत्राला उत्तर देताना भारत सरकारकडून हे उत्तर आलं आहे. आम्ही केलेल्या आग्रहावर लक्ष देण्याऐवजी भारताने याप्रकरणी पुन्हा नव्याने तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसंच जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईद आणि उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे लष्कर-ए-तोयबाचा कमांड जकीउर रहमान लखवी यांच्यावर खटला चालवण्याची मागणी केली आहे'.
पाकिस्तान सरकारने 30 जानेवारी रोजी हाफिज सईदसहित जमात-उद-दावाच्या चौघांना नजरकैदेत ठेवलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या हाफिज सईदची 2009 मध्ये न्यायालयाने सुटका केली होती.