‘जेएनयू’त पुन्हा डावे, ‘दिल्ली’त अभाविप
By admin | Published: September 11, 2016 06:59 AM2016-09-11T06:59:17+5:302016-09-11T06:59:17+5:30
दिल्लीतील डाव्या विद्यार्थी चळवळींचे केंद्र असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा डाव्यांनीच बाजी मारली आहे
नवी दिल्ली : दिल्लीतील डाव्या विद्यार्थी चळवळींचे केंद्र असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा डाव्यांनीच बाजी मारली आहे. तर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली असून, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरचिटणीसपदी त्याच संघटनेचे विद्यार्थी निवडून आले आहेत. सहचिटणीसपदी काँग्रेसप्रणीत नॅशनल स्टुडंटस् युनियन आॅफ इंडियाचा (एनएसयूआय) विद्यार्थी निवडून आला आहे.
जेएनयूत सर्व चार जागा जिंकून डाव्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जेएनयू स्टुडंटस् युनियनचा मावळता अध्यक्ष कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले होते. अभाविपने दिल्ली विद्यापीठात विजय मिळवला असला तरी आतापर्यंत तिथे त्याच संघटनेची सत्ता होती; मात्र चार वर्षांनंतर प्रथमच एनएसयूआयचा एक जण तरी पदाधिकारी झाला आहे. जेएनयूमध्ये अभाविपला भोपळाही फोडता आला नाही.
दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शुक्रवारी निवडणुका झाल्या. दिल्ली विद्यापीठ स्टुडंट युनियनच्या निवडणुकीत ३५ टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी ८ टक्के मतदान कमी झाले, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्टुडंट युनियनच्या निवडणुकीत विक्रमी ५९ टक्के म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत यावेळी ६ टक्के अधिक मतदान झाले.