वयाच्या ७३ व्या वर्षी आमदार उत्तीर्ण झाले एमएची परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:14 AM2021-05-24T09:14:07+5:302021-05-24T09:14:47+5:30
हरियाणातील जननायक जनता पार्टीचे (जजपा) आमदार ईश्वर सिंह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे दाखवून दिले आहे.
- बलवंत तक्षक
चंदीगड : हरियाणातील जननायक जनता पार्टीचे (जजपा) आमदार ईश्वर सिंह यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसल्याचे दाखवून दिले आहे. कोरोना काळाचा सदुपयोग करून त्यांनी शिकण्याची इच्छा पूर्ण करून ८५ टक्के गुणांसह ते कुरुक्षेत्र विद्यापीठातून एम. ए. प्रथम वर्ष परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
त्यांनी घरूनच ऑनलाईनने परीक्षा दिली होती. तिसऱ्यांदा एम. ए. करणारे ईश्वर सिंह यांनी मागच्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान एम. ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमासाठी बाह्य विद्यार्थी म्हणून कुरुक्षेत्र विद्यापीठात नोंदणी केली होती.
घरीच अभ्यास करून त्यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यांनी या पूर्वीच लोकप्रशासन आणि इतिहासात एम. ए. केले आहे. एल.एल.बी आणि एल.एल.एमही त्यांनी केली आहे. १९७७ मध्ये २९ वर्षी आमदार झाल्यानंतर त्यांनी या पदव्या संपादित केल्या आहेत.
राजकारणात येण्यापूर्वीच दहावी केल्यानंतर ते जेबीटी (ज्युनियर बेसिक ट्रेनिंग) अभ्यासक्रम केला होता. काही काळ ते शाळेत शिक्षकही होते.
हरियाणा शालेय शिक्षण मंडळाचेही ते अध्यक्ष होते. त्यांनी सांगितले की, ४२ व्या वर्षी मी एल.एल.बी केले होते. सहा महिने कुरुक्षेत्रमध्ये वकिलीही केली. ते आजही कुरक्षेत्र वकील संघाचे सदस्य आहेत. हरियाणातून राज्यसभा सदस्य आणि राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे चेअरमनही होते.
माणसाने शिक्षणाची सुवर्णसंधी कधीही सोडू नये. यासाठी वयाचा कधीच विचार करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे.