बिहार निवडणुकीत वयाचा घोटाळा, 5 वर्षात तब्बल 14 अन् 12 वर्षांची वाढ
By महेश गलांडे | Published: October 24, 2020 01:24 PM2020-10-24T13:24:04+5:302020-10-24T13:26:37+5:30
बिहार निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपली असून जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी केली असता काही उमेदवारांच्या वयांमध्ये घोळ झाल्याचं दिसून येत आहे.
पाटणा - निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आले, उमेदवारांच्या गडगंज संपत्तीची आकडेवाडीही समोर येत. गेल्यावर्षीच्या तुलनेत कुणी किती संपत्ती कमावली, एका वर्षात किती टक्क्यांनी संपत्ती वाढली, या सगळ्याचा उहापोर निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. त्यातच, तुमची सर्व माहिती सत्यप्रतिनिशी सादर करावी लागते. बिहार निवडणुकीत रंगत आली असून तेथील उमेदवारांचा वयाचा घोटाळा प्रकाशझोतात आला आहे.
बिहार निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपली असून जवळपास सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी केली असता काही उमेदवारांच्या वयांमध्ये घोळ झाल्याचं दिसून येत आहे. कारण, गेल्या विधानसभा निवडणुकातील आणि यंदाच्या निवडणुकांवेळी या उमेदवारांच्या वयांमध्ये केवळ 2 वर्षे, तब्बल 10 वर्षे तर काहींच्या वयामध्ये एक वर्षही वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे. एकूण 12 उमेदवारांच्या वयांमध्ये घोटाळा असल्याचे उघडकीस आले आहे.
महेश्वर हजारी कल्याणपूर (समस्तीपूर वाली) विधानसभा मतदारसंघाचे जदयू उमेदवार आहेत. सन 2015 मध्ये या उमेदवारांचे वय 44 वर्षे होते. मात्र, 2020 मध्ये त्यांचे वय 58 वर्षे झाले आहे. म्हणजे, अर्जावरील आकडेवाडीनुसार 5 वर्षात तब्बल 14 वर्षांनी त्यांचं वय वाढलं आहे.
ताराकिशोर प्रसाद कटीहार मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार असून त्यांचं वय गेल्या 5 वर्षात तब्बल 12 वर्षांनी वाढलं आहे. सन 2015 च्या एफिडेव्हीट अर्जात त्यांचे वय 52 वर्षे होते, ते 2020 मध्ये 64 वर्षे झाले आहे.
पूर्णिया विधानसभा मतदारसंघातील इंदु सिन्हा काँग्रेसच्या उमेदवार आहेत. इंदु सिन्हा यांचं 2015 साली वय 45 वर्षे होते, ते आता 55 वर्षे झाले आहे. म्हणजे, केवळ 5 वर्षात दुप्पटीने त्यांचं वय वाढलं आहे.
विद्यासागर निषाद यांचं वय गेल्या 5 वर्षात 9 वर्षांनी वाढलं आहे, सन 2009 साली सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक निषाद यांनी लढवली होती. सन 2015 साली निषाद यांनी आपलं वय 43 वर्षे नमूद केलं होतं. तर यंदाच्या निवडणुकावेळी त्यांनी आपलं वय 52 वर्षे दर्शवले आहे.
अमरनाथ गामी हे दरभंगा विधानसभा मतदारसंघातील राजदचे उमेदवार आहेत. सन 2000 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. सन 2015 साली निवडणूक अर्जात त्यांनी आपलं वय 49 वर्षे लिहिलं होतं. विशेष म्हणजे 2020 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातही त्यांचे वय 49 वर्षेच आहे. यावरुन गेल्या 5 वर्षात त्यांचं वय एकही वर्षे वाढलं नसल्याचं दिसून येतंय.
बिहार निवडणुकांमधील वयांचा हा घोळ चर्चेचा विषय बनला असून खोट्या कागदपत्रांच्या आधारे उमेदवार आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता, निवडणूक आयोग या उमेदवारांवर कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे.