मुदतीपूर्वीच आवळले रस्ते
By admin | Published: August 29, 2015 12:28 AM2015-08-29T00:28:24+5:302015-08-29T00:28:59+5:30
पोलिसांशी हुज्जत : शहरवासीय त्रस्त
नाशिक : सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील, असे जाहीर करून नागरिकांना आश्वासित करणाऱ्या पोलीस यंत्रणेने आपल्याच घोषणेपासून पाठ फिरवत दुपारनंतर महत्त्वाचे रस्ते बॅरिकेडिंगने आवळण्यास सुरुवात केली, परिणामी सायंकाळच्या भरवशावर घराबाहेर पडलेल्या नोकरदारांशी अनेक ठिकाणी हुज्जतीचे प्रसंग घडले. आयुक्तांचे आदेश आम्हाला माहिती नाहीत, असे सांगून बंदोबस्तावरील पोलिसांनी नागरिकांना पिटाळून लावले.
शनिवारच्या पर्वणी दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी रामकुंडाला केंद्रस्थानी मानून प्रमुख रस्ते व चौकात ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर केले तसेच भाविक व प्रशासकीय मार्गावर वाहनांना बंदी घालून अन्य रस्त्यांवर प्रवेशबंदी जाहीर केली. पर्वणीच्या अगोदर चोवीस तास रस्ते बंद करण्याच्या पोलिसांच्या या कृतीवर तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करण्यात आल्याने अखेर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रस्ते खुले राहतील, अशी घोषणा पोलीस आयुक्तांनी केली व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील दळणवळण व्यवस्था सुरुळीत असताना त्यानंतर मात्र पोलिसांनी ‘नो व्हेईलक झोन’मधील रस्ते आवळण्यास सुरुवात केल्याने नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी ६ पर्यंत रस्ते खुले राहतील या पोलीस आयुक्तांच्या घोषणेचा त्यांना विसर पडून दुपारनंतर पंचवटी कारंजा, तपोवन क्रॉसिंग या ठिकाणचे रस्ते बंद करून टाकले. (प्रतिनिधी)