एन्काऊंटरवर विरोधक आक्रमक
By Admin | Published: November 1, 2016 02:39 AM2016-11-01T02:39:20+5:302016-11-01T02:39:20+5:30
सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली
नबीन सिन्हा,
नवी दिल्ली- भोपाळजवळ चकमकीत सिमीचे आठ अतिरेकी मारले गेल्यानंतर काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. भाजपने अशाप्रकारचा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सुरक्षा दलाचे नीतीधैर्य दडपणे ठरते, असा आरोप करीत प्रत्युत्तर दिले आहे.
एआयएमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी हा अल्पसंख्यकांवरील घाला असल्याचे सांगत न्यायालयीन चौकशीची मागणी केली. या प्रकरणी सत्य बाहेर आणण्यासाठी न्यायालयीन चौकशी करावी, असे काँग्रेस आणि माकपनेही म्हटले. काँग्रेस आणि माकप सिमीचे समर्थन करीत असून, या प्रकरणाला राजकीय रंग देत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
काय घडले याबाबत विस्तृत माहिती बाहेर येत आहे. आम्ही अहवालाची प्रतीक्षा करू त्यानंतरच प्रतिक्रिया देऊ, असे काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी म्हटले.
अतिरेक्यांनी पलायनाचा कट फार आधीच आखला असावा, अशी शक्यता केंद्रीय गृहमंत्रालय आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अतिरेक्यांकडे कारागृहात शस्त्रे नव्हती. कारागृहाबाहेर पडताच त्यांनी ती कशी मिळविली, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
>कोणत्या परिस्थितीत अतिरेकी पळून गेले हे सरकारला कळावे यासाठी मी न्यायालयीन चौकशीची मागणी करीत आहे. अति सुरक्षा असलेल्या कारागृहातून अतिरेकी कसे पळून गेले, काही तासांतच त्यांना कसे पकडण्यात आले आणि ठार मारण्यात आले, ते जनतेला कळायला हवे.
- कमलनाथ, काँग्रेसचे खासदार.
सिमीचे आठही जण पोलिसांच्या निर्दयतेचे बळी ठरले आहेत. त्यांच्याविरुद्धची प्रकरणे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, मात्र सरकारला त्यांचा दोष सिद्ध करता आलेला नाही. त्याच भीतीपोटी मध्य प्रदेशच्या पोलिसांनी या सर्वांची हत्या केली.
- असादुद्दीन ओवेसी, एआयएमआयएमचे नेते.
यापूर्वी काँग्रेसने लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांचे समर्थन केले होते. आता हा पक्ष सिमीच्या अतिरेक्यांचे समर्थन करीत आहे. या पक्षाचे नेते सुरक्षा दलाचे नैतिक धैर्य दडपत आहेत.
- जीव्हीएल नरसिंह राव,
भाजपचे प्रवक्ते.
या चकमकीबाबत दिलेली माहिती अतिशय संशयास्पद आहे. सरकार आणि मध्य प्रदेश पोलिसांच्या दाव्यातील विसंगती समोर आली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक आहे.
- वृंदा करात, माकपच्या नेत्या.
याआधी खंडवा कारागृहातून अतिरेकी पळून गेले होते. हे पहिल्यांदाच घडले नाही. मध्य प्रदेशातच पुनरावृत्ती घडावी, हे आश्चर्यकारक आहे.
- ज्योतिरादित्य शिंदे, काँग्रेसचे खासदार.