भाजपने आखली आक्रमक, स्मार्ट रणनीती; लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:25 AM2023-04-25T07:25:51+5:302023-04-25T07:26:10+5:30

लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार; काँग्रेसला निवडणुकीत शह देण्याचा जोरदार प्रयत्न

Aggressive, smart strategy devised by BJP; Lingayat will expand beyond votes | भाजपने आखली आक्रमक, स्मार्ट रणनीती; लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार

भाजपने आखली आक्रमक, स्मार्ट रणनीती; लिंगायत मतांपलीकडे विस्तारणार

googlenewsNext

सुनील चावके
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वक्कलिग आणि दलित मतांच्या वाढत्या समर्थनामुळे आश्वस्त झालेल्या भाजपने यंदा कर्नाटकच्या निवडणुकीत विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या काँग्रेसला शह देण्यासाठी लिंगायत मतांपलीकडे पक्षाचा विस्तार करण्याची ‘स्मार्ट’ व आक्रमक रणनीती आखली आहे.

विरोधी पक्षांच्या वक्कलिग आणि दलित मतांना खिंडार पाडून भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागा जिंकताना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ८.३८ टक्के जास्त मिळविली होती. भाजपचे हे मोठे यश वक्कलिग समाजाचे नेते माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा तसेच दलित समाजाचे बडे नेते काँग्रेसचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पराभवांनी अधोरेखित झाले होते.  

माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या प्रभावी लिंगायत नेत्यांच्या जोरावर बहुसंख्य लिंगायत मते मिळणार याविषयी भाजप नेत्यांना शंका नाही. पण वक्कलिग आणि दलित मतदारांच्या आधारे पक्षाचा पाया घट्ट करण्यासाठी सत्ता आल्यास आगामी मुख्यमंत्री लिंगायत समाजाचा नसेल, असे संकेत भाजपश्रेष्ठींनी दिले आहेत. राज्याच्या राजकारणात प्रथमच लिंगायत मतांपलीकडे विस्तारण्याचे निर्णायक पाऊल यावेळी भाजपने उचलले आहे. काँग्रेस भाजपच्या चालीला कसे उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अशी केली व्यूहरचना
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०८ जागा जिंकल्या होत्या. पण पंतप्रधान मोदींकडे आकर्षित झालेल्या वक्कलिग आणि दलित मतांमुळे वर्षभरानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपने १७० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी प्रस्थापित केली. हा बदल निर्णायक ठरणार असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. लिंगायत, वक्कलिग आणि दलित या तीन मोठ्या व्होट बँकांवर नजर केंद्रित करीत भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

Web Title: Aggressive, smart strategy devised by BJP; Lingayat will expand beyond votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.