उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये आंदोलक आक्रमक; अमित शहांच्या घराजवळ निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 04:56 AM2019-12-21T04:56:12+5:302019-12-21T04:56:30+5:30
ड्रोनच्या मदतीने बारीक लक्ष; शर्मिष्ठा मुखर्जींसह काँग्रेसचे ५० कार्यकर्ते ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने करणाऱ्या दिल्ली महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शर्मिष्ठा मुखर्जी व त्यांच्यासमवेत असलेल्या ५० महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. शर्मिष्ठा मुखर्जी या माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या आहेत. या सर्वांना दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. लोकशाही मार्गाने व शांततेने निदर्शने करत असूनही आम्हाला ताब्यात घेण्यात आले, असा आरोप या निदर्शकांनी केला आहे.
उत्तर प्रदेशात आंदोलक आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ आणि दगडफेक केली.
उत्तर दिल्लीत जमावबंदी लागू
उत्तर दिल्लीतील १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली. या परिसरात पोलिसांनी ध्वजसंचलन केले. नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधातील आंदोलनात तीन दिवसांपूर्वी या भागामध्ये हिंसाचार झाला होता. तेथील परिस्थितीवर ड्रोन विमानांच्या सहाय्याने पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राखण्यासाठी पोलिस सहआयुक्त आलोककुमार, पोलीस उपायुक्त वेदप्रकाश सूर्या यांच्या उपस्थितीत पोलिसांनी उत्तर दिल्लीमध्ये ध्वजसंचलन केले. सीलमपूर भागामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी रशिद नावाच्या आरोपीस गुरुवारी अटक करण्यात आली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या व जंतरमंतरकडे जाणाºया निदर्शकांना शुक्रवारी दुपारी दिल्ली गेटनजिक अडविण्यात आले. दिल्लीत सुरू असलेल्या निदर्शनांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून चावरी बाजार, लाल किल्ला, जामा मशीद येथील तीन मेट्रो स्थानके तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. नागरिकत्व कायदाविरोधात पोलिसांच्या गोळीबारात कर्नाटकमधील मंगळुरू येथे गुरुवारी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तसेच आंदोलकांनी रेल व रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर केरळ, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून सुरक्षा दले अतिशय सतर्क आहेत.
आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरू
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आसाममध्ये गुरुवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून ही सेवा स्थगित केलेली होती. पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी शांततेने निदर्शने पार पडली.
अनेक राज्यांत सुरक्षा दले सतर्क
च्उत्तर प्रदेशमधील इंटरनेट व एसएमएस सेवेवरील स्थगिती अद्याप उठविण्यात आलेली नाही. अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केल्यानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा दले सतर्क आहेत. या शहरातील इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.
केरळमध्येही तणावाचे वातावरण
च्कर्नाटकामध्ये हिंसाचार झाल्याचे लक्षात घेऊन केरळमधील वायनाड, कासारगोड, कोडिकोळ, कन्नूर या जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
च्कर्नाटकमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जण मरण पावल्याचे वृत्त पसरताच केरळमध्येही विविध ठिकाणी गुरुवारी रात्रीपासून निदर्शकांनी रास्ता व रेल रोको आंदोलन केले. कर्नाटकमधील मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा पुढील दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे.