पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड
By बाळकृष्ण परब | Published: December 29, 2020 10:01 AM2020-12-29T10:01:51+5:302020-12-29T10:03:31+5:30
Farmer Protest : कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता.
चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पंजाबमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पंजाबच्या विविध भागांमध्ये मोबाईल कंपन्यांच्या टॉवर्सना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड करण्यात आली आहे. अनेक मोबाईल टॉवरचा वीजपुवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी केबलचे बंडल जाळण्यात आले आहेत.
कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि त्यांचे सहकारी मोबाईल टॉवरचे नुकसान करत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप आणि रिलायन्स रिटेलला लक्ष्य केल्याचा आरोप झाला होता. नव्या कृषी कायद्यांचा सर्वाधिक फायदा उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांना होणार असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून या कंपन्यांच्या साधनसंपत्तीला लक्ष्य करण्यात येत आहे.
Punjab: Locals of Ekta Nagar near Moga vandalised a mobile tower in support of farmers protesting against Centre's farm laws, last night. Police say, "We are verifying facts of the incident. The farmers have condemned this act. They are not supporting such actions." pic.twitter.com/rHRm5UUMJU
— ANI (@ANI) December 28, 2020
पंजाबमध्ये जिओचे ९ हजार मोबाइल टॉवर आहेत. त्यापैकी अनेक टॉवरचा वीजपुरवठा बंद करण्यात येत आहे. एका ठिकाणी काही लोकांनी मोबाइल टॉवरसाठी लावण्यात आलेला जनरेटर पळवला. सरकारी सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत ४३३ मोबाइल टॉवरची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्याने परिस्थिती चिघळली आहे.
#WATCH Villagers of Tibbi Kalan in Punjab's Firozpur vandalise a telecom tower to express their support towards farmers protesting against the three farm bills pic.twitter.com/sCWMYiU0Kq
— ANI (@ANI) December 28, 2020
दरम्यान, मोबाईल टॉवर लक्ष्य करण्यात येत असल्याच्या प्रकारांमुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पंजाबमध्ये अराजकता आणि कुठल्याही खासगी किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. राज्यात शांततापूर्वक आंदोलनांना स्थगिती दिली जाणार नाही. मात्र कुठल्याही संपत्तीचे नुकसान सहन केले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मोबाईल टॉवरच्या नुकसानीमुळे ऑनलाइन वर्ग आणि वर्क फ्रॉम होम, बँकिंग सेवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.