रस्त्यासाठी आमदाराने केले कुर्ता पायजमा सोडून आंदोलन
By admin | Published: February 28, 2017 07:28 PM2017-02-28T19:28:45+5:302017-02-28T19:28:45+5:30
आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केल्याने बिहारमधील एका आमदार महोदय सध्या चर्चेत आहेत.
Next
> ऑनलाइन लोकमत
पाटना, दि. 28 - आपल्या मागण्या मान्य करवून घेण्यासाठी अनेक आमदार मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतात, हे तुम्ही पाहिलेच असेल. पण आपल्या मतदारसंघातील रस्त्याची मागणी मान्य करवून घेण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केल्याने बिहारमधील एका आमदार महोदय सध्या चर्चेत आहेत. या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी चक्क उघड्याने विधानसभेत येण्यास सुरुवात केली. अखेर त्यांचे आंदोलन फळाला आले असून, त्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामांनाही मंजुरी मिळाली आहे.
विनय बिहारी असे या अनोखे आंदोलन करणाऱ्या आमदारांचे नाव असून, ते भारतीय जनता पक्षाकडून लौरिया या मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते मतदारसंघातील रस्त्याराठी आंदोलन करत होते. मात्र मागणी मान्य होत नसल्याने बिहारी यांनी आपला कुर्ता आणि पायजमा काढून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना पाठवला. तसेच जोपर्यंत रस्त्याला मंजुरी मिळेपर्यंत कुर्ता आणि पायजमा न घालण्याची घोषणा केली होती. बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान उघडेबंब होऊन विधानसभेत आल्याने विनय बिहारी चर्चेत आले होते.
अखेर केंद्र सरकारने त्यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद केली. तसेच बिहार सरकारनेही या रस्त्याचे काम दोन महिन्यात करण्यास मंजुरी दिली. त्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी स्वत: पुढाकार घेत हे अनोखे आंदोलन करणाऱ्या विनय बिहारी यांना कुर्ता पायजमा परिधान करवला.